दुधातून बाळाला आईने पाजले अमली पदार्थ

सामना ऑनलाईन । फिरोजपूर

असं म्हणतात, आईचं दूध हे तान्ह्या बाळासाठी अमृतासारखे असते. परंतु पंजाबमध्ये एक वेगळाच प्रकार घडला आहे. समावर्ती जिल्ह्यातील फिरोजपूर येथे एका २२ दिवसांच्या नवजात बाळाला आईचं दूध पाजायला डॉक्टरांनी नकार दिला. त्याचं कारण म्हणजे त्या आईला अमली पदार्थांचे सेवन करण्याची सवय होती आणि त्याद्वारे त्या बाळाला देखील अमली पदार्थांची सवय लागली होती. आता सध्या ती आई व्यसनमुक्ती केंद्रात दाखल आहे.

समावर्तीमध्ये राहणारी ही ३२ वर्षीय महिला गेल्या काही दिवसांपासून व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत आहे. निशा (काल्पनिक नाव) हिचं १ वर्षापूर्वी लग्न झालं होते. एका ऑर्केस्ट्रामध्ये नर्तकी म्हणून काम करणाऱ्या निशाला अमली पदार्थांचं व्यसन होतं. लग्नानंतर गर्भवती राहिलेल्या निशाने अमली पदार्थ सेवन करणं थांबवलं असलं, तरी शरीराला लागलेली चटक ती औषधांद्वारे पूर्ण करत होती. २२ दिवसांपूर्वी तिने एका बाळाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर तिने पुन्हा अमली पदार्थ घ्यायला सुरुवात केली.

या दरम्यान, तिच्या बाळाला काही त्रास सुरू झाले. बाळ रडत नाही, त्याला भूक लागत नाही आणि सारखा झोपून राहतो, अशा तक्रारी घेऊन निशा डॉक्टरांकडे गेली. तेव्हा हा सगळा प्रकार डॉक्टरांच्या लक्षात आला. निशा अमली पदार्थाचं सेवन केल्यानंतर बाळाला अंगावर दूध पाजत होती. स्तनपानाद्वारे तिच्या मुलाच्या पोटात अमली पदार्थ जात होते. त्यामुळे ते बाळंही व्यसनात अडकलं होतं. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी तिला दूध बंद करण्यास सांगितलं. सध्या निशावर व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत आहे.