इगतपुरीतील पिंप्री सदो-टाकेद रस्त्याचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

भंडारदरा, कळसुबाईकडे जाण्याचा मार्ग सुकर

सामना प्रतिनिधी । नाशिक

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून ५० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो फाटा ते टाकेद या ४३ किलोमीटरच्या रस्त्याचे मंगळवारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मुंबईसह राज्यभरातील पर्यटकांना भंडारदरा, कळसुबाई शिखराकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पर्यटनालाही मोठी चालना मिळणार असून, परिसरातील रहिवाशांचा अनेक वर्षांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटला आहे.

नाशिक-मुंबई महामार्गालगत घोटी-इगतपुरी दरम्यान असलेल्या या रस्त्याची स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठी दुरावस्था झाली होती. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या केंद्रीय प्रादेशिक मार्ग निधीतून हा रस्ता मंजूर केला. ४३ किलोमीटर अंतराच्या या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रस्त्यामुळे इगतपुरी परिसर, पिंप्री, भावली, आंबेवाडी, खडकेद, इंदोरी, वासाळी, सर्वतिर्थ टाकेद, भंडारदरावाडी यासह परिसरातील गावे, वाडय़ा, पाडय़ांची दळणवळणाची समस्या कायमची सुटली आहे.

पर्यटनाला चालना मिळणार

हा संपूर्ण रस्ता नागमोडी वळणाचा असून, डोंगरांमधून जातो. भावली धरणासह दाट झाडी यामुळे संपूर्ण मार्गच निसर्गाने नटलेला आहे. पुढे भंडारदरा धरण असून, जवळच सर्वात उंच असे कळसूबाईचे शिखर आहे. शनिवारी, रविवारी या रस्त्यावर नाशिक, मुंबईसह राज्यातील पर्यटकांची वर्दळ असते. आता संपूर्ण रस्ताच सिमेंट काँक्रीटचा झाल्याने पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी साडेदहाला या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजी करीत आदित्य ठाकरे यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शिवसेना खासदार हेमंत गोडसे, नाशिक लोकसभा जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमास इगतपुरीचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर, नाशिक महानगरप्रमुख अजय बोरस्ते, महापालिका गटनेते विलास शिंदे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, विनायक पांडे, इगतपुरी तालुकाप्रमुख भगवान आडोळे, कावजी ठाकरे, राजेंद्र नाठे, नगरसेवक चंद्रकांत खाडे, सुदाम डेमसे, श्याम साबळे, सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, संतोष गायकवाड, भागवत आरोटे, जगन आगळे, प्रल्हाद जाधव आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठय़ा संख्येने हजर होते.