येत्या विधानसभा निवडणुकीत खरीखुरी शिवशाही येईल, आदित्य ठाकरे यांची ग्वाही

सामना प्रतिनिधी, नाशिक

तरुणांनो, तुमच्या हातातील फडकणारा हा शिवसेनेचा भगवा येत्या निवडणुकीत मंत्रालयावर डौलाने फडकेल आणि खरीखुरी शिवशाही येईल असा आत्मविश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यावेळी उपस्थित हजारो तरुणांनी, नागरिकांनी ‘शिवसेना ‘झिंदाबाद’चा जयघोष करीत आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेच्या शिवशाहीचीच सत्ता आणणार अशी ग्वाही दिली.

मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सर्वरोगनिदान शिबीर व मोफत दाखले वाटप कार्यक्रम तर नांदगावला आरोग्य शिबीर आणि विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी आदित्य ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हा राजकीय कार्यक्रम नाही तरीही हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित आहे. तरुण हजर आहेत. त्यांच्या प्रेमापोटी मी बोलतोय. हजारो तरुणांच्या हातात भगवा डौलाने फडकत आहे. हा भगवाच पुढच्या वर्षीच्या निवडणुकीत मंत्रालयावर फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मालेगाव येथील कार्यक्रमाचे आयोजन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, युवासेना विस्तारक आविष्कार भुसे यांनी तर नांदगावच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी केले होते.

पुढचा आमदार शिवसेनेचाच
नांदगाव येथे आदित्य ठाकरे म्हणाले की, येथे स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे, फक्त आमदारच नाही. पुढचा आमदार शिवसेनेचाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथील विद्यमान आमदार कुणी बघितला नाही. आता तुमच्यात राहणारा, तुमचा शिवसेनेचा आमदार विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.

केरळ पूरग्रस्तांसाठी एक लाखाची मदत
शिवसेनेच्या मालेगाव येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने केरळमधील पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयांची मदत आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

summary- aditya thackeray on assembly election