आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

सामना  प्रतिनिधी , नाशिक  

-आज मालेगाव, नांदगावमध्ये आरोग्य शिबीर;
-पिंपळगाव-बसवंत येथे स्व-संरक्षण प्रशिक्षण
-उद्या भगूर बसस्थानकाचे भूमिपूजन
-पांढुर्लीत टेलीमेडिसीनचा शुभारंभ

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दोन दिवसांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी मालेगाव, नांदगाव आणि पिंपळगाव-बसवंत येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध समाजोपयोगी कार्यक्रम होणार आहेत. शनिवारीही नाशिक, भगूर, पांढुर्ली येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी दिली.

मालेगाव येथे शुक्रवार, 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, युवासेना विस्तारक आविष्कार भुसे यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन व मोफत दाखले वाटपाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. नांदगाव येथे दुपारी 2 वाजता ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी आयोजित केलेले आरोग्य शिबीर व सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रमही त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. पिंपळगाव-बसवंत येथे दुपारी 4 वाजता ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड यांनी सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम आयोजित केला आहे तेथे आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5 वाजता दिंडोरीतील मोहाडी येथे सह्याद्री ऍग्रोला ते भेट देणार आहेत.