पनवेलमध्ये आदित्य ठाकरे यांचा दणदणीत रोड शो

2

सामना प्रतिनिधी । पनवेल

महापालिका निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असतानाच आज युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा पनवेलमध्ये दणदणीत आणि खणखणीत रोड शो झाला. शिवसेनेचा जयजयकार, फडकणारे भगवे झेंडे, मोटारसायकलवर स्वार झालेली तरुणाई आणि ठिकठिकाणी आदित्य ठाकरे यांचे होणारे जंगी स्वागत यामुळे अवघा माहोल भगवामय झाला होता.

सायंकाळी ६ वाजता शहरातील प्रबोधनकार ठाकरे मार्ग येथून शिवसेनेच्या रोड शोचा प्रारंभ झाला. आदित्य ठाकरे यांनी जीपवर उभे राहून पनवेलवासीयांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आदेश बांदेकर, जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, जिल्हा सल्लागार बबन पाटील, महिला आघाडी संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर, जिल्हा संघटक रेखा ठाकरे, युवा सेनेचे वरुण देसाई, युवा सेना जिल्हा चिटणीस रूपेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे उमेदवार व शिवसैनिक उपस्थित होते.

पुष्पवृष्टी, हस्तांदोलन आणि सेल्फी
आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. तरुणाईने तर आदित्य ठाकरे यांना वेढाच घातला होता. त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी प्रचंड गर्दी होत होती. आदित्य ठाकरे यांच्यासोबत एक सेल्फी काढण्याचा मोह तरुणाईला आवरत नव्हता. ही भगवी रॅली लाइन आळी, जयभारत नाका, टिळक रोड, एम. जे. रोड या मार्गांवरून नवीन पनवेलकडे मार्गस्थ झाली.