लातूर, धाराशीव जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्तांना आदित्य ठाकरे यांचा दिलासा

58

सामना प्रतिनिधी, लातूर/धाराशीव

मोठमोठे होर्डिंग्ज लावून कर्जमाफीचा डांगोरा पिटण्यात येत आहे, पण प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. कुणाचे 17 रुपये, कुणाचे 13 रुपये माफ झाले आहेत. ही शेतकऱयांची क्रूर थट्टाच आहे. शेतकरी हा गुन्हेगार आहे का म्हणून त्याला माफी देताय? शेतकरी हा आमचा पोशिंदा आहे. त्यामुळे कर्जमाफी नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट बजावले.

लातूर जिल्हय़ात चलबुर्गा, बुधोडा तर धाराशीव जिल्हय़ात नारंगवाडी, समुद्राळ, जेवळी आदी दुष्काळग्रस्त भागांची आज आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. या वेळी त्यांच्या हस्ते दुष्काळग्रस्तांना मदतीचे वाटपही करण्यात आले. दुष्काळाचे संकट भयंकर आहे. पावसाचा थेंबही पडला नाही, पण अश्रंtचा महापूर दाटला आहे. दोन्ही हंगाम हातून गेल्यामुळे शेतकऱयांसमोर जगण्याचा मोठा प्रश्न आहे. संकट मोठे असले तरी शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी आहे, असा विश्वास या वेळी आदित्य ठाकरे यांनी दुष्काळग्रस्तांना दिला.

या वेळी त्यांच्यासोबत सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाप्रमुख कैलास पाटील, माजी आमदार दिनकर माने, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम आदींची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या