तुम्ही ओवेसी असाल, मी ठाकरे आहे! आदित्य ठाकरे यांचा सणसणीत इशारा

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

शिवसेनेने जातपात बघून कधीही राजकारण केले नाही. त्यामुळे जातीपातीचे राजकारण करून शहराचे वातावरण खराब करू नका. तुम्ही ओवेसी असाल, मी ठाकरे आहे, असा सणसणीत इशारा शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.

संभाजीनगर येथे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी जातीपातीच्या राजकारणावर सडकून टीका केली. शिवसेनेने कधीही जातीपातीचे हीन राजकारण केले नाही, पण सध्या शहरात जातीपातीच्या नावावर विष कालवण्याचे काम होत आहे. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात तीन आमदार उभे आहेत. एमआयएमचे जलील कधी आले होते का तुमची विचारपूस करण्यासाठी? नशिबाने विधानसभेत गेले, आता दिल्लीत जाण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांचे नेते ओवेसी आले आहेत. त्यांना एकच सांगतो. आम्ही सगळय़ा धर्मांचा आदर करतो. विस्तवाशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही ओवेसी असाल, माझ्या धमन्यांमध्येही बाळासाहेबांचे रक्त आहे. वातावरणात विष कालवू नका. शिवसेनाप्रमुखांचे या शहरावर खास प्रेम होते हे लक्षात ठेवा, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी देताच उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला.

विकासकामांचा आढावा नियमित घेतो
केंद्र आणि राज्यात युतीचे सरकार आहे. युतीचे खासदार, आमदार चांगले काम करीत आहेत. मी संभाजीनगरला नियमित येत असतो. कामाचा आढावाही घेतो. रस्ते, एसटीपी प्लॅण्ट, स्मार्टसिटीतून सिटीबस सेवा सुरू करण्यात आली. या शहरासाठी आणखी भरपूर काही करायचे आहे. चांगली कामे केल्यामुळेच देशभरातून कामासाठी स्थलांतरीत नागरिक झालेले राहायला येतात यावरूनच विकासकामे झाल्यामुळे हे नागरिक आनंदाने राहतात, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मंदिरे वाचवणारे खैरे
अतिक्रमणांच्या नावाखाली शहरात मंदिरे पाडण्यात आली. त्यावेळी चंद्रकांत खैरे यांनी जीवाची पर्वा न करता मंदिरे वाचवण्याचे काम केले. या भागातील हिंदूंची मंदिरे वाचवलीत. मंदिरांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्यच आहे. यापुढेही आम्ही हे काम करत राहू. सत्ता असो वा नसो, शिवसेना भक्कमपणे हिंदूच्या पाठीशी असेल असे वचन त्यांनी यावेळी दिले.

भष्ट्राचारी काँग्रेसने 15 वर्षे नासवली
केंद्रात काँग्रेसचे दहा वर्ष आणि राज्यात 15 वर्षे सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस-भष्ट्राचारी काँग्रेसने कोणताही विकास केला नाही, सत्तेत राहून घोटाळे करीत त्यांनी राज्याचे वाटोळे केले. राज्यात कामे न झाल्यामुळे 15 वर्षे नासवली. भ्रष्टाचारी काँग्रेसचे घड्याळ तर बंद पडले. अशा भष्ट्राचारी काँग्रेसच्या हातात पुन्हा सत्ता देणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

दुष्काळात शिवसेनेचे काम सर्वाधिक
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शिवसेना जेवढी काम करते तेवढे विरोधी पक्ष करत नाही. दुष्काळी भागातील जनतेसाठी पिण्याचे पाणी, टँकर, पाण्याच्या टाक्या, सामूहिक विवाह सोहळे, जनावरांना चारा, वीजपुरवठा ही कामे करून प्रत्येक नागरिक आपला म्हणून मदत पोहचविण्याचे काम शिवसेना करत आली आहे, यापुढेही करत राहणार आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.