बळीराजाला मदत करण्यासाठी आलो आहे – आदित्य ठाकरे

2

सामना प्रतिनिधी । धाराशिव 

सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सामान्य माणूस व शेतकरी दुष्काळात भरडला जात आहे. तेव्हा दुष्काळावर राजकारण करण्यापेक्षा मी बळीराजाला मदत करुन कर्तव्य पार पाडण्यासाठी आलो असल्याचे शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते धाराशिव येथील छायादीप मंगल कार्यालयात शेतकरी व महिलांना मदत वाटप कार्यक्रमात बोलत होते.

याप्रसंगी शिवसेनेचे खासदार  रविंद्र गायकवाड, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख कैलास पाटील,  गौतम लटके, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष तथा युवासेना राज्य विस्तारक सुरज साळुंके आदिंची उपस्थिती होती.

शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत आहेत.  मंगळवारी  सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करुन त्यांचे दुपारी धाराशिव येथे आगमन झाले.  यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी नाही, जनावरांसाठी चारा नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी जगायचे कसे असा प्रश्न आहे आणि हीच परिस्थिती सगळीकडे दिसत आहे. अशा परिस्थितीत जनावरे जगणार कशी, काही भागात तर पेरणीही झाली नाही. पाण्याअभावी झाडेही सुकू लागली आहेत. अशा गंभीर दुष्काळी परिस्थितीमध्ये शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठिशी उभी आहे. तेव्हा अशा परिस्थितीस स्वतःचे बरे वाईट करुन घेण्याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही शिवसेनेला हाक द्या, तुमच्या हाकेसरशी माझ्यासह शिवसैनिक तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतील” असा शब्द त्यांनी शेतकर्‍यांना दिला.

शेतकर्‍याच्या कर्जमाफीविषयी बोलताना ते म्हणाले की, सध्या कर्जमाफीचा ढोल बडवला जात आहे, परंतू कर्जमाफी द्यायला शेतकरी हा काय गुन्हेगार नाही. तेव्हा शेतकर्‍यांची सरसकट कर्जमुक्ती हवी आहे. ही कर्जमुक्ती करुन घेणार म्हणजे घेणारच असा विश्वास याप्रसंगी शेतकर्‍यांना दिला. आजपासून शेतकर्‍यांना व त्यांच्या जनावरांसाठी शिवसेनेच्या वतीने मदतीचे वाटप सुरु करण्यात आले असून या पुढील काळातही तुम्हाला जी मदत हवी आहे, ती मदत करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली.