दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी : आदित्य ठाकरे

16


सामना प्रतिनिधी । धाराशिव

मी संपुर्ण महाराष्ट्रात फिरत असून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी केली आहे. मागील चार वर्षापासून दुष्काळी परिस्थिती असून यावर्षी सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी अजिबात पेरणी झालेली नाही. संपुर्ण महाराष्ट्रात जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत असून सर्वत्र भयाण दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळ कितीही गंभीर असला तर तरी शिवसेना तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिल असे आश्वासन शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले.

शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी धाराशिव तालुक्यातील उमरगा व लोहारा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. आदित्य ठाकरे यांचे दुपारी अडीचच्या सुमारास लातूरहून जिल्ह्यातील नारंगवाडी येथे आगमन झाले. या ठिकाणी जमलेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या ठिकाणी 25/15 या योजनेतून गावाअंतर्गत 10 लाख खर्च करुन तयार करण्यात आलेल्या गावातंर्गत रस्त्याचे आणि नागरंगवाडी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या टाकीचे लोकापर्ण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर समुद्राळ या गावास भेट देवून आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. याठिकाणी जनावरांना लागणाऱ्या पशुखाद्याचे वाटप आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जेवळी येथेही शेतकरी बांधवाची भेट घेवून त्यांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. याही ठिकाणी त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या जनावरासांठी लागणाऱ्या चाऱ्याचे वाटप तसेच ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे लोकर्पण करण्यात आले. तसेच रस्त्यावर असणाऱ्या तोरंबा या गावातील एका विहरीची पाहणी करुन हराळी येथील शाळेच्या मागील बाजूस सुरु असलेल्या नाला रुंदीकरण कामाची पाहणी त्यांनी केली.

समुद्राळ व जेवळी येथील शेतकरी व ग्रामस्थाशी संवाद साधताना ते म्हणाले की, मी राज्यात फिरत असून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. एकूणच राज्यात जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. काही भागात पेरण्या झाल्या असल्या तरी काही भागात पेरणी झालेली नाही असे सांगून तुमच्या मनात काय आहे जे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. पाऊस पडेपर्यंत शिवसेना कोणालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू देणार नाही, असे सांगून त्यांनी किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असा प्रश्न करुन ज्या लोकांची कर्जमाफी झाली नाही, त्या लोकांनी आपली माहिती आमच्याकडे द्यावी, आम्ही त्यांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकरी हा गुन्हेगार नाही, त्यामुळे माफी असा प्रकार नाही, तेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्यात आली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना ते म्हणाले की, परिस्थिती गंभीर आहे, तेव्हा अशा परिस्थितीवर आपण मात करायला शिकले पाहिजे, या परिस्थितीत आपले बरे-वाईट करुन घेण्याचा विचार अजिबात करु नका, ज्यावेळी मदतीची गरज पडेल. त्यावेळी शिवसेनेची आठवण करा, शिवसेना तुम्हाला मदत करेल असे ते म्हणाले.

या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्यासोबत धाराशिवचे खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख कैलास पाटील, जिल्हा युवा अधिकारी अक्षय ढोबळे, महिला आघाडी जिल्हा संघटक शामल वडणे, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे, किरण गायकवाड, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवासेनेचे विधानसभा संघटक शरद पवार, लोहाऱ्याच्या माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे, युवासेना उपजिल्हा युवाअधिकारी योगेश तपसाळे, जि. प. सदस्य शेखर घंटे, नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, शाम नारायणकर, अभिमान खराडे, जगन पाटील, एम. डी. माने, संतोष मगर यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या