शेतकऱ्यांनो हाक मारा, शिवसेना तुमच्यासाठी धावून येईल; आदित्य ठाकरे यांची दुष्काळग्रस्तांना ग्वाही


सामना ऑनलाईन । सोलापूर

शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका, शिवसेना तुमच्यासोबत आहे. फक्त हाक मारा, शिवसेना तुमच्यासाठी धावून येईल, अशी ग्वाही शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिली. त्यांनी आपुलकीने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आदित्य ठाकरे लातूर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्या अडचणी समजावून घेत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या टाक्याचे वाटपही करण्यात येत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील बंद असलेल्या तलावाची पाहणी केली. तसेच सारोळे येथे जावून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळी परिस्थितीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे सोलापूर जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यापैकी 9 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. अनेक तालुक्यात सरकारची मदत पोहचलेली नाही. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.

शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका, शिवसेना तुमच्यासोबत आहे. फक्त हाक मारा, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना तातडीने धावून येईल, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचा विश्वास दिला. ते सारोळेमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. शेतकऱ्यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी खंबीरपणे उभे राहावे असे ते म्हणाले. शिवसेना दुष्काळाचे राजकारण करत नाही. सर्व पक्षांनी मिळून दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असेही आवाहनही त्यांनी केले. आदित्य ठाकरे यांच्याहस्ते मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी, पोखरापूर, सारोळे, डिकळस, मसले चौधरी, नरखेड, खवणी, पेनूर, हारळवाडी या गांवाना पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप तसेच जनावराच्या चाऱ्याचे वाटपही करण्यात आले. यावेळी मोहोळचे दिपक गायकवाड, काका देशमुख, विक्रांत काकडे, अशोक भोसले, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, संभाजी शिंदे, नगरसेवक मनोज शेजवाळ, अमोल शिंदे, शहरप्रमुख हरिदास चौगुले, महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे ग्रामीण भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी मोहोळनंतर माढा येथे जावूनही शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, खासदार रवी गायकवाड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.