मोखाडय़ात लेकरंबाळं घेऊन महिला तहसील कार्यालयावर धडकल्या


सामना ऑनलाईन । मोखाडा

साहेब दोन दिवसांतून अर्धा टँकर पाडय़ात येतो… दोन हंडेही पाणी मिळत नाहीत… भरउन्हात पाण्याच्या शोधात पायाला फोड आलेत… सांगा आम्ही कसे जगायचे… आमच्या पोराबाळांची तहान कशी भागवायची… एकदा काय तो फैसला कराच, अशी कैफियत घेऊन डोल्हारे गावातील आदिवासी महिलांनी मोखाडा तहसील कार्यालयावर धडक दिली. लेकरंबाळांना घेऊन गेलेल्या या महिलांनी तब्बल सहा तास कार्यालयात ठिय्या दिला होता.

मोखाडय़ात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असून टंचाईग्रस्त गावांची संख्या 65 झाली आहे. शासनाकडून टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा होत असला तरी तो 2011 च्या जनगणनेनुसार सुरू आहे. त्यामानाने गेल्या आठ वर्षांत मोखाडय़ाची लोकसंख्या अनेक पटीने वाढली आहे. त्यामुळे शासनाकडून सध्या होणारा पाणीपुरवठा तुटपुंजा असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी डोल्हारे ग्रामपंचायतीतील आदिवासी महिलांनी तहसील कार्यालय गाठले. दोन दिवसांनी एकदा गावांना टँकरने पाणीपुरवठा होतो. अवघ्या 10 हजार क्षमतेचा हा अर्धा टँकर गावकऱयांची तहान कशी भागवणार, असा सवाल यावेळी महिलांनी केला. दोन ते तीन हंडे जेमतेम मिळत असल्याने धुणीभांडी आणि जनावरांना पाणी देण्यासाठी भरउन्हात पायपीट करावी लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. निदान दिवसातून एकदा तरी टँकरने पाणीपुरवठा करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हंडा रिकामीच
मुलाबाळांसह भरउन्हात तहसील कार्यालय आदिवासी महिलांनी गाठले. मात्र उत्तर देण्यास कोणीच उपलब्ध नसल्याने सहा तासांच्या ठिय्यानंतरही त्यांना रिकाम्या हातीच परतावे लागले.