उत्सव आदिम कलांचा

नम्रता भिंगार्डे

शहरांमधल्या गाडय़ांच्या आणि लोकांच्या गोंगाटापासून दूर जंगलात झाडाझुडपांच्या सळसळीत,पक्ष्यांच्या किलबिलाटात राहणाऱया आदिवासींनी त्याच्या आजूबाजूच्या आवाजांची लय पकडत गाणी रचली. त्या आवाजांचा बेमालूम वापर करत आदिवासी संस्कृती आणि कला समृद्ध होत गेली. निसर्गाशी नातं सांगणाऱया आपल्याच देशातल्या आदिवासींची ही कला जवळून बघण्याची संधी नुकतीच मुंबईकरांना मिळाली ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या ‘आदिरंग महोत्सव’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने.

गजबजलेल्या प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिरात तीन दिवसीय आदिरंग महोत्सव पार पडला. यानिमित्ताने सलग चौथ्या वर्षी देशाच्या कानाकोपऱयातून आलेल्या आदिवासी कलाकारांनी मुंबईकरांचं मन जिंकून घेतलं. कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड, छत्तीसगड,मध्य प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, इतकंच काय तर लेह-लडाखहूनही अनेक आदिवासी ग्रुप्स आपली कला सादर करण्यासाठी मुंबापुरीत दाखल झाले होते. हिंदुस्थान देशातली विविधता एकाच मंचावर अवतरली असल्याचा भास होत होता. प्रत्येक राज्यातल्या आदिवासींची भाषा, कपडे, गाणी, वाद्ये वेगवेगळी होती त्यामुळे प्रत्येक सादरीकरणानंतर पुढचं सादरीकरण आश्चर्यचकित करायचं.

घासियारी नृत्य, मुल्लू हेग्गे कुनिता, पुली नृत्य (वाघाचा मुखवटा घालून केलेलं नृत्य), मयाली अट्टम, ठाकुरीलुनाई, सिखला….प्रत्येक राज्याच्या आदिवासी नृत्याचं नाव वैशिष्टय़पूर्ण होतं. पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सोबतीने आदिवासी कारागीरांच्या कामाला चांगलं व्यासपीठ मिळावं यासाठी आदिरंग या महोत्सवात विविध वस्तूंचे स्टॉल्स लावले जातात. ‘इको फ्रेंडली’चा ट्रेंड नुकताच शहरांमध्ये प्रसिद्ध व्हायला लागलाय; मात्र आदिवासी कायमच इको फ्रेंडली वस्तूंचाच वापर आणि निर्मिती करतात. आदिवासी कारागिरांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या या वस्तूंना दरवर्षी भरभरून मागणी असते.

आदिवासी कलांमध्ये मनुष्याचं मूळ स्वरूप दिसतं. आदिवासींची गाणी आणि त्यांची संस्कृती म्हणजे या पिढीकडून पुढच्या पिढीकडे सुपूर्द झालेला खजिना आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे दिग्दर्शक प्रो. वामन केंद्रे यांचे वडील बीडमधल्या एका गावात भारुडकार म्हणून प्रसिद्ध होते. लहानपणापासून लोककलांनी वामन केंद्रेंवर झालेल्या लोककलांच्या श्रीमंतीचे दर्शन इतरांनाही व्हावे या हेतूने त्यांनी चार वर्षांपासून ‘आदिरंग महोत्सवाची’ सुरुवात केली. बंगाल, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, अंदमान आणि दमण या राज्यांमध्ये दरवर्षी हा महोत्सव भरतो. या महोत्सवामुळे तिथल्या तिथल्या शहरी मानसिकतेच्या लोकांना आपल्या देशाची ही आदिम संस्कृती पाहता आणि अनुभवता येते. तर आदिवासी कलाकारांना यानिमित्ताने आपल्या गावाची, राज्याची हद्द ओलांडून अधिक काही शिकण्याची संधी मिळते आणि त्यांच्या कलेला रसिकही मिळतात. डोंगरदऱयांत गुंजणाऱया आदिवासींच्या गाण्यांना आणि नृत्याला आदिरंग महोत्सवाने शहरांत आणले आणि इमारतींच्या जंगलात राहणाऱयांना काही क्षण का होईना व्हर्च्युअली निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्यात हा महोत्सव यशस्वी ठरलाय.

दरवर्षी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकलेले आणि मुंबईत येऊन बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध झालेले अनेक अभिनेते आदिरंग महोत्सवाला भेट देतात. यंदा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी हजेरी लावली होती. देशभरातले आदिवासी कलांचे अभ्यासकही ही सुवर्णसंधी साधून मुंबईत आले होते. एकूणातच रवींद्र नाटय़ मंदिराच्या कलांगणात आदिवासी कलांचा उत्सव साजरा झाला आणि या उत्सवात आदिवासींसोबतच मुंबईकरही उत्साहाने सामील झाले.