शिवसेनेमुळे परवानग्यांचे विघ्न टळले, मंडपांसाठी अर्ज स्वीकारण्याचे प्रशासनाचे आदेश

सामना प्रतिनिधी, मुंबई

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना पालिका प्रशासनाने मंडपांना परवाने देणे बंद केले होते. परवाने देण्यासाठी ५ ऑगस्टपर्यंतचीच मुदत असल्याचे अनेक मंडळांना माहीत नव्हते. मात्र शिवसेनेने याविषयी आवाज उठवल्यानंतर मंडपांना परवानगी देण्याचे आदेश विभाग कार्यालयांना जारी केले. त्यामुळे मुंबईतील शेकडो गणेशोत्सव मंडळांच्या मागचे विघ्न टळले आहे.

येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र मंडपासाठी परवानग्यांचे विघ्न निर्माण झाले होते. बुधवारी स्थायी समितीत शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी याबाबत प्रशासनाला धारेवर धरले. गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांत उत्सवाची धामधुम सुरू होईल. मात्र मंडपासाठीच्या परवानग्या दिल्या जात नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्थायी समितीत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी गंभीर दखल घेऊन गणेशोत्सव मंडळांचे मंडपांच्या परवानगीसाठी येणारे अर्ज त्वरित स्वीकारण्याचे आदेश दिले. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे.

  • पालिकेच्या २४ विभागांतून ५ ऑगस्टपर्यंत मंडपासाठी परवानगी घेण्याचे परिपत्रक पालिकेने काढले होते. त्यानंतर परवानगी मिळणार नाही असे आदेश पालिका प्रशासनाने काढले होते. मात्र अनेक गणेश मंडळांना त्याबद्दल माहिती नव्हती.
  • ५ ऑगस्टनंतर विभाग कार्यालयातून परवानग्या देणे बंद केल्यामुळे आयोजकांची मोठी अडचण झाली आहे. सहायक आयुक्त आणि उपायुक्त यांना परवानग्या देण्यासंदर्भात सक्त सूचना आयुक्तांनी द्याव्यात अशी मागणी सातमकर यानी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे केली.
  • शिवाय शुल्क आकारून यापुढे परवानगीसाठी येणाऱया मंडळांना परवानगी द्यावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
    मुंबईत ११ हजार सार्वजनिक मंडळे असून त्यापैकी अनेक मंडळांच्या परवानग्या रखडल्या आहेत.