जाहिरात ते अभिनय

  • नितीन फणसे

अभिजित साटम. जाहिरात क्षेत्रातील हा माणूस आता अभिनयही करतोय…

जाहिरातविश्व असो वा मालिकांचे जग… दोन्ही ठिकाणी स्टोरीटेलिंग महत्त्वाचं असतं. जाहिरातीत जे ३० सेकंदांत सांगायचं असतं ते मालिकांमध्ये २५ ते २२ मिनिटांमध्ये सांगावं लागतं. हा एक फरक वगळला तर दोन्ही क्षेत्रांमध्ये काहीच वेगळं नाही… सांगताहेत अभिजीत साटम. ‘शतदा प्रेम करावे’ ही त्यांची पहिलीच डेलीसोप मालिका नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झाली आहे. ते पुढे सांगतात, जाहिरात आणि मालिका यांचं सादरीकरण वेगळं असतं. आम्ही दोन ते तीन दिवस एकच जाहिरात शूट करत असतो, पण येथे एक ते दीड दिवसांत २२ मिनिटांचं चित्रण करावं लागतं. टीव्हीला थोडं अॅलर्ट राहून काम करावं लागतं. जाहिराती प्रीप्लॅन्ड असतात. मालिका साधारण प्रीप्लॅन्ड असल्या तरी आवश्यकतेनुसार त्यात बदल केले जाऊ शकतात.

मालिकाविश्वात प्रथमच डेलीसोप करण्याबद्दल अभिजीत साटम म्हणतात, पाचेक वर्षांपूर्वी मालिकांचे काही एपिसोड्स केले होते. डेलीसोप अजून केली नव्हती. ती आता प्रथमच करतोय. त्याआधी माझा सॉफ्टवेअरचा बिझनेस आणि जाहिरातींची कामं जोरात सुरू असल्याने मला मालिका वगैरे करायला जमत नव्हतं. आता ती सगळी कामं सेट झाली आहेत. त्यातच आता माझी चांगली मैत्रीण स्मृती शिंदे, ज्या सोबो फिल्म्सच्या निर्मात्याही आहेत त्यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेबद्दल गळ घातली. त्यात ही मालिका स्टार प्रवाहसाठी होता हेही माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. मोनिका वगैरे आणखीही काही मंडळी होती ज्यामुळे माझ्या कामातून वेळ काढून मी ही मालिका हातात घेतली. मुळात मला गोष्ट आवडली, माझी भूमिका आवडली. त्यामुळे करायला मजा येतेय. नवीन गोष्टी शिकायला मिळताहेत.

आधीचे काम आणि आताचं काम यापैकी कोणतं एखादं काम आवडतं असं विचारता ते म्हणतात, मला दोन्ही भावतं. मुळात आपण आपल्याला भाऊ आवडतो की बहीण आवडते असं सांगू शकत नाही. तसंच हेही आहे. माझ्या आधीच्या कामातही काही गमतीजमती आहेत. आता नव्या कामातही जरा वेगळ्या पण गमतीजमती आहेतच. अडमेकर म्हणून मला सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं, पण येथे अभिनेता असल्याने फक्त माझ्या परफॉर्मन्सवर लक्ष देता येतं. तेच मला द्यायचं असतं. पण दोन्ही गोष्टी मला आवडतात. मी सगळं एन्जॉय करतोय…

स्वतःचे अप बनवणार!
या मालिकेसोबतच आणखीही बरेच काही उद्योग अभिजीत साटम करत आहेत. याबाबत विचारता हसून ते म्हणाले, मालिका करत असलो तरी माझं प्रॉडक्शनचं काम सुरूच राहणार आहे. माझ्या काही सॉफ्टवेअर्सचे प्लॅटफॉर्म्स लाँच होतील. तो बिझनेस बऱ्यापैकी चाललाय. माझी टीम आहे. ती सगळं हॅण्डल करतेय. शासनासाठी आम्ही काही सॉफ्टवेअर्स बनवतोय. प्रोग्राम्स बनवतोय. शिवाय आमचं ऑनलाइन टिकिटींगचं कामही वाढतंय. सिलीकॉन नावाच्या मॅगझिनच्या टॉप-२० ऑनलाईन बुकींग करणाऱ्यांमध्ये आमच्या टिकिटींग डॉट कॉमला स्थान मिळालंय. शिवाय आम्ही मोबाईल अॅप
लाँच करतोय. एका नाटकाचं प्रॉडक्शनही एप्रिलमध्ये सुरू होतंय. त्याचं शिर्षक आणि कास्टींग सुरू आहे. महेश मांजरेकर यांचा एक चित्रपटही करतोय. त्याचं डबिग सुरू होईल. आणखीही एक सिनेमा सुरू आहे आणि एका सिनेमाबद्दल विचारलं गेलंय.

मी उन्मेषसारखाच…
‘शतदा प्रेम करावे’ मालिकेत मला उन्मेषची भूमिका करायला मिळाली आहे. बहुतांशी मी या उन्मेषसारखाच आहे. कारण तोही लहान वयात मॅच्युअर झालाय. तो वर्कहॉलिक आहे, मीही आहे. चारपाच गोष्टी एकाचवेळी करत असतो. मीही तसंच करतो. रविवारीही मला काम करावं लागतं. खरं सांगायचं तर मला हे गुंतलेलंपण आवडतंय. उन्मेषही सतत त्याच्या कामात गुंतलेला, त्याच्या ऑफिसातल्या लोकांशी बोलत राहणारा दाखवलाय. एक साधं सरळ कॅरेक्टर आहे हे… तो थोडा प्रॅक्टिकल आहे. पण मध्येच रोमांटिकही आहे, थोडा तिच्यावर रागावतोसुद्धा… ह्युमन कॅरेक्टर आहे, असंही अभिजीत साटम सांगतात.