मृत्यूदंडाच्या पद्धतीविरोधात वकिलाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

फाशीची शिक्षा ही मृत्यूदंड देण्याची सर्वात क्रूर पद्धत आहे. यामुळे मृत्यूदंडासाठी फाशीव्यतिरिक्त इतर पद्धतींचा अवलंब करावा अशी याचिका सर्वेाच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वेाच्च न्यायालयाचे वकील ऋषि मल्होत्रा यांनी ही याचिका केली आहे. त्याचबरोबर मरेपर्यत फाशी देण्याचे प्रयोजन असलेले सीआरपीसीचे कलम ३५४ (५) रद्द करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
मल्होत्रा यांनी याचिकेत विधी आयोगच्या १७८ व्या अहवालाचा दाखला दिला आहे. हा अहवाल ऑक्टोबर २००३ चा आहे. या अहवालात मृत्युदंडाचे विविध प्रकार देण्यात आले आहेत. फाशीच्या शिक्षेबरोबरच इंजेक्शन देऊन मृत्यूदंड देता येऊ शकतो. यासाठी सीआरपीसीच्या कलम ३५४ (५) मध्ये संशोधन करण्याची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मल्होत्रा यांनी याचिकेत मरेपर्यत फासावर लटकावण्याचे कलम रद्द करण्याची मागणी केली आहे. मृत्यूदंड देण्याचा हा सर्वात क्रूर व अमानवीय प्रकार आहे. अमेरिकेतील ३५ राज्यांमध्ये फाशीची शिक्षाच बंद करण्यात आली असून त्याऐवजी गोळ्या घालणे आणि इलेक्ट्रीक चेअरची पद्धत अवलंबली जात असल्याचे याचिकेत मल्होत्रा यांनी म्हटले आहे.

फाशी देण्याची पध्दत व ज्याला फाशीची शिक्षा होणार आहे त्या दोषी व्यक्तीची मनस्थिती यावरही मल्होत्रा यांनी याचिकेत प्रकाश टाकला आहे. सहा दोषींना फासावर लटकवण्यासाठी डायसवर आणलं जातं. त्यांचे चेहरे काळ्या फडक्यांनी झाकले जातात. फाशी देण्याआधी फाशीचा दोर व दोषीचे वजन पेलण्याची त्याची क्षमता याची चाचपणी केली जाते. त्यानंतर दोषींना फाशी दिली जाते. अर्धा तास त्यांना तसेच लटकवून ठेवले जाते. ही सर्वात क्रूर पध्दत आहे. फाशी दिल्यानंतर मृत्यू होण्यास ३० ते ४५ मिनिट लागतात. पण इलेक्ट्रीक चेअरवर २ मिनिटात मृत्यू होतो. गोळी घातल्यानेही लवकर मृत्यू होतो. असेही याचिकेत नमुद करण्यात आला आहे.
जीवनातील अनेक महत्वाच्या अधिकारांमध्ये सन्मानाने मरणे हा देखील अधिकार आहे. असेही याचिकेत मल्होत्रा यांनी म्हटले आहे. हवाईदल, नौदल, आणि लष्करात आर्मी एक्ट अंतर्गत मृत्यूदंडाचे दोन विकल्प आहेत. यात फाशी किंवा गोळी मारणे या शिक्षांचा समावेश आहे. असेही मल्होत्रा यांनी याचिकेत म्हटले आहे.