क्षुल्लक कारणावरून वकील पिता-पुत्रास मारहाण: मोटारसायकलसह घराची तोडफोड

1

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

घरासमोर उभा असताना दुचाकीचा कट का मारला, याचा जाब विचारणाऱ्या वकील पिता-पुत्रास मारहाण करून दुचाकी व घराची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी रात्री साऊथ सिटीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साऊथ सिटी येथे राहणारे अ‍ॅड. कमलाकर तांदुळजे यांचा मुलगा शुभम हा मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घरासमोर उभा होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या सुनील गाडे याने त्याला कट मारला. तू कट का मारला, असा जाब शुभमने विचारताच सुनील गाडे भडकला. ‘हा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का’ असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली.

ही बाब अ‍ॅड. तांदुळजे यांच्या लक्षात येताच त्यांनी सुनील यास समजावण्याचा प्रयत्न केला असता सुनील व त्याच्यासोबत असलेल्या संतोष आडे, सोमीनाथ तुपे, संतोष गाडे, विजय शिनगारे, ज्ञानेश्वर काळे, अनिल गाडे, संगीता गाडे, सुभाष गाडे, अजय गाडे, संगीता हिचे वडील व इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्तींनी दोघा पिता-पुत्रास शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीतून जीव वाचविण्यासाठी घाबरलेल्या पिता-पुत्राने रामदास लाभर यांच्या घरी आश्रय घेतला असता वरील आरोपींनी लाभर यांच्या घरात प्रवेश करून त्यांना पुन्हा मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी व स्कूटीची लाकडी दांड्याने तोडफोड करून घराच्या खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले. या मारहाणप्रकरणी अ‍ॅड.तांदुळजे यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.