वकिलांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात 5 हजार कोटींची तरतूद करा!

1

सामना प्रतिनिधी, मुंबई

वकील आणि पक्षकारांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात 5 हजार कोटींची तरतूद करा, देशातील विविध बार असोसिएशनकरिता लायब्ररी, चेंबर, पक्षकारांना बसण्याकरिता जागा त्याचप्रमाणे स्वच्छतागृह आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून द्यावी. वकील आणि त्यांच्या कुटुंबीयांचा इन्शुरन्स काढण्यात यावा, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बार कौन्सिलच्या वतीने सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यासाठी उद्या मंगळवारी आझाद मैदानात वकिलांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

बार कौन्सिलच्या नवोदित वकिलांना महिन्याकाठी 10 हजार रुपये वेतन देण्यात यावे, वकिलांना गृहयोजना राबविण्यासाठी अल्प दरात सरकारने भूखंड उपलब्ध करून द्यावा व इतर विविध मागण्या बार कौन्सिलच्या वतीने करण्यात आल्या आहेत यासंदर्भात राज्य सरकारला अनेकवेळा बार कौन्सिलच्या वतीने निवेदने देण्यात आली आहेत, मात्र सरकारने त्याची दखल न घेतल्याने बार कौन्सिलच्या वतीने मंगळवार, 11 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे सेक्रेटरी प्रवीण रणपिसे यांनी दिली.