हिंदुस्थान एएफसी आशिया चषकासाठी पात्र, मकाऊचा उडवला ४-१ ने धुव्वा

सामना प्रतिनिधी, बंगळुरू

आशियाई फुटबॉल क्षेत्रात आपल्या खेळाचा दर्जा उंचावणाऱ्या हिंदुस्थानी सीनियर फुटबॉल संघाने बंगळुरू पाहुण्या मकाऊ संघावर ४-१ अशी शानदार मात करीत तब्बल सहा वर्षांनंतर २०१९ च्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा बहुमान मिळवला. या स्पर्धेत १९६४ मध्ये उपविजेतेपद पटकावण्याचा पराक्रम हिंदुस्थानने केला होता.

बंगळुरूच्या श्रीकांतीरवा स्टेडियममध्ये आज खेळवण्यात आलेल्या एएफसी पात्रता लढतीत पूर्वार्धात २८ व्या मिनिटालाच टोलीन बोर्जेसने मकाऊच्या गोलीला चकवून हिंदुस्थानला १-० असे आघाडीवर नेले. त्यानंतर ३७व्या मिनिटाला मकाऊच्या निकोलस तारावने हिंदुस्थानी बचाव भेदत आपल्या संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

स्वयंगोलने पाहुणे गोत्यात
१-१ अशा बरोबरीनंतर कर्णधार सुनील क्षेत्री, संदेश झिंगण व बलवंत सिंग यांनी मकाऊच्या गोलक्षेत्रावर आक्रमणाचा धडाका लावला. ७०व्या मिनिटाला कर्णधार सुनील क्षेत्रीने बलवंतसिंगच्या पासवर अप्रतिम गोल नोंदवत हिंदुस्थानला २-१ असे आघाडीवर नेले. या आघाडीनंतर मकाऊच्या बचावपटूंतील समन्वय कमी झाला आणि हिंदुस्थानचे आक्रमण थोपवण्याच्या नादात मकाऊच्या बचावपटूने आपल्याच गोलजाळ्यात चेंडू धाडला. या स्वयंगोलने पाहुण्यांची पिछाडी १-३ अशी दोन गोलनी वाढवली. त्यानंतर लढतीच्या अखेरच्या क्षणात जेजे लालपेखलुआने संघासाठीचा चौथा गोल डागला. अखेर हिंदुस्थानने मकाऊवर ४-१ असा विजय मिळवत आशिया कप स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला.