प्रेम प्रकरण पडले महागात , ‘घटस्फोटित पत्नीला द्यावी लागणार अर्धी श्रीमंती


सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले अॅमेझॉनचे संस्थापक अध्यक्ष, अब्जाधीस जेफ बेजॉस यांची श्रीमंती लवकरच जाणार आहे. बेजॉस यांना आपली अर्धी संपत्ती घटस्फोटीत पत्नी मॅकेन्झीला द्यावी लागेल. याचे मूल्य तब्बल 5 हजार अब्ज रुपये इतके आहे. बेजॉस हे एका मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या संसाराबरोबरच श्रीमंतीलाही घरघर लागली.

जेफ बेजॉस आणि मॅकेन्झी यांनी विभक्त होण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. त्यांचा विवाह 1993ला झाला होता. त्यांना चार मुले आहेत. 25 वर्षांच्या संसारानंतर वेगळे होण्यामागे जेफ बेजॉस यांचे प्रेमप्रकरण कारणीभूत आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध निवेदिका, अभिनेत्री लॉरेन सॅचेझ हिच्याबरोबर बेजॉस यांचे प्रेमप्रकरण 2009 पासून सुरू आहे. सॅचेझ ही बेजॉस यांचा मित्र पीटर व्हाइटशेलची पत्नी आहे. मॅकेन्झीचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता. अनेकदा तडजोड करण्याचा प्रयत्न झाला; पण अखेर मॅकेन्झीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

मॅकेन्झी होणार जगातील सर्वांत श्रीमंत महिला
अमेरिकन कायद्याप्रमाणे घटस्फोटीत पत्नीला अर्धी संपत्ती द्यावी लागते. अॅमेझॉनचे संस्थापक, अध्यक्ष बेजॉस यांच्याकडे 137 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. यातील अर्धी 69 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 5000 अब्ज रुपयांची संपत्ती मॅकेन्झीला मिळेल. 5000 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीमुळे जगातील सर्वांत श्रीमंत महिला मॅकेन्झी ठरेल. तर, बेजॉस श्रीमंतीच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यापेक्षा गरीब होणार आहेत.