अफगाणी नागरिकाने उडवली पाकिस्तानी पंतप्रधानांची खिल्ली, व्हिडीओ व्हायरल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने देखील हिंदुस्थानला युद्धाची धमकी दिली होती. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी हिंदुस्थानने हल्ला केला तर पाकिस्तान शांत बसणार नाही असे वक्तव्य केले होते. पाकिस्तानच्या या वक्तव्याचा एका अफगाणी नागरिकाने खरपूस समाचार घेतला असून पाकिस्तानी पंतप्रधानांची अक्षरश: लाज काढली आहे. त्या अफगाणी नागरिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत सदर अफगाणी नागरिक पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान व पाकिस्तानी जनतेची खिल्ली उडवत हसताना दिसत आहे. त्याने मांडलेल्या मुद्द्यावरून त्याने पाकिस्तानला त्यांचा खरा चेहरा उघड केला आहे. ‘जर पाकिस्तान स्वत:ची हिंदुस्थानशी तुलना करत असेल तर ती कधी होऊच शकत नाही. पाकिस्तान कुठे आणि हिंदुस्थान कुठे? हिंदुस्थानात दरवर्षी 6000 डॉक्टर व 10000 इंजिनिअर तयार होतात. तर पाकिस्तानात काय बनतं? 15000 सुसाई़ड बॉम्बर. आणि ते अफगाणिस्तानला पाठविले जातात. तुमच्याकडे ना बुद्धी आहे ना इस्लाम आहे. तुमचा देश फक्त एक दहशतवादी देश आहे. या देशाच्या वजीर-ए-आलमची देखील विमानतळावर तपासणी होते. कपडे काढून तपासणी केली जाते. तुम्ही दहशतवाद्यांना जो पैसा देता तो तुमच्या देशाच्या विकासासाठी लावा पण तुम्ही तसे करणार नाही. कारण तुम्ही सर्व सैतान आहात. सैतान काही चांगले काम करेलच कसे?’ अशी जबरदस्त टीका तो अफगाणी व्यक्ती या व्हिडीओतून करताना दिसत आहे.