अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय, आयर्लंडवर मात करीत उघडले कसोटीत विजयाचे खाते

सामना प्रतिनिधी, डेहरादून

अफगाणिस्तानने आयर्लंडवर मात करून कसोटी क्रिकेटमधील विजयाचे खाते उघडून इतिहास घडविला. एका सामन्याच्या या मालिकेत अफगाणिस्तानने आयर्लंडला 7 गडी राखून हरविले. चौथ्याच दिवशी संपलेल्या या कसोटीत दोन्ही डावांत अर्धशतके झळकवणारा रहमत शाह सामन्याचा मानकरी ठरला.

डेहरादून येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या लढतीत आयर्लंडला 172 धावांत गुंडाळल्यानंतर अफगाणिस्तानने 314 धावसंख्या उभारून पहिल्या डावात 142 धावांची मोठी आघाडी घेतली. आयर्लंडने दुसऱ्या डावात 93 षटकांत 288 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानने तिसऱया दिवसाच्या 1 बाद 29 धावांवरून सोमवारी पुढे खेळायला सुरुवात केली. इहसनुल्लाह (नाबाद 65) व रहमत शाह (76) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 139 धावांची भागीदारी करून अफगाणिस्तानला विजयाच्या उबंरठ्यावर नेले.

रहमत शाह बाद झाल्यानंतर आलेला मोहम्मद नबीही एका धावेवर धावबाद झाला. मग इहसनुल्लाहने हशमतुल्लाह शाहिदीच्या (नाबाद 4) साथीने 47.5 षटकांत 3 बाद 149 धावा करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. उभय संघांनी कारकीर्दीतील दुसरा कसोटी सामना खेळला. अफगाणिस्तानने 9 महिन्यांपूर्वी बंगळुरूमध्ये हिंदुस्थानविरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांना 262 धावांनी हार पत्करावी लागली होती. आयर्लंडने गतवर्षी मे महिन्यात पाकिस्तानविरुद्ध पदार्पणाचा कसोटी सामना खेळला होता.

आयर्लंडच्या खेळाडूचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम
आयर्लंडच्या पहिल्या डावात केवळ 172 धावा झाल्या. या डाकात 11 क्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या टीम मूर्ताघने अर्धशतकी (नाबाद 54) खेळी केली. दुसऱ्या डावातही टीमने याच अखेरच्या क्रमांकावर येऊन 27 धावा केल्या. या दोन खेळींच्या जोरावर टीम मूर्ताघने 142 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही न जमलेला विक्रम केला. दोन्ही डावांत 11 क्या क्रमांकाला फलंदाजीसाठी येऊन 25 धावांपेक्षा अधिक वैयक्तिक धावसंख्या करणारा तो पहिला कसोटीपटू ठरला आहे, हे विशेष.

आपली प्रतिक्रिया द्या