२० वर्षांनंतर सुचित्रा बांदेकर यांचे रंगभूमीवर पुनरागमन

1

सामना प्रतिनिधी, मुंबई

रंगभूमीपासून आपली कारकीर्द सुरू करणारे बरेचसे कलाकार चित्रपट-मालिकांमध्ये काम केल्यानंतर पुन्हा नाटकांकडे वळल्याचं आपण नेहमीच पाहात आलो आहोत. छोटा आणि मोठा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री सुचित्रा बांदेकर तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर दिसणार आहेत.

डॉ. विवेक बेळे लिखित तसेच चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘कुत्ते कमीने!’ या नाटकात सुचित्रा एक महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. २० वर्षांपूर्वी त्यांनी ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकात काम केले होते.

रंगभूमीवरील पुनर्पदार्पणाबाबत त्या म्हणाल्या की, नाटकापासून मी कधीच दूर गेले नव्हते. नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच. मध्यंतरीच्या काळात चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करण्यासोबतच निर्मितीच्या कामातही व्यग्र असल्याने रंगभूमीवर काम करू शकले नव्हते. पुनरागमनासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतीक्षेत होते.