कल्याण-मुरबाड-नगर रेल्वेचे भिजतं घोंगडं, तीस वर्ष उलटूनही अर्थसंकल्पात स्थान नाही

गोपाळ पवार | मुरबाड

कल्याण मुरबाड माळशेज नगर रेल्वे व्हावी ही मुरबाडसह जुन्नर आळेफाटा नगरवासियांची मागणी तीन दशकांहूनही अधिक काळ आहे. असे असले तरी राजकारण्यांनी फक्त आश्वासने देऊन येथील जनतेची थट्टाच केल्याची भावना संसदेच्या चालू अर्थसंकल्पाच्या निमित्ताने पुढे आली आहे. संसदेच्या चालू अर्थसंकल्पातही कल्याण नगर रेल्वे मार्गाला स्थान दिलेले नाही.
कल्याण मुरबाड माळशेज नगर हा महामार्ग सध्या अस्तित्वात आहे. याच महामार्गावरून रोज नगर, पुणे, अकोला परिसरांतून हजारो लोक कामधंद्यासाठी कल्याण, मुंबई, नवीमुंबई परिसरात असल्याने त्यांना नाईलाजास्तव कल्याण मुंबई परिसरात भाड्याने किंवा विकत घेऊन रहावे लागते. विद्यार्थ्यांचीही अशीच काहीशी परिस्थिती आहे. रेल्वे नसल्याने जलद विनासायास कमी खर्चिक प्रवास होऊ शकत नाही. पर्यायाने खर्चिक प्रवास व वाहतूक करावी लागते. यामुळे शेतीमालाला जरी भाव जास्त मिळाला तरी वाहतूक खर्च जास्त पडत असल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडत नाही.

पावसाळ्यात तर माळशेज घाटातील दरडी पडण्याचे प्रमाण नेहमी असल्याने अनेक वेळा घाट बंद असतो. त्यामुळे हजारो लोकांना यामार्गे प्रवास व वाहतूक करता येत नाही. पर्यायाने कोट्यवधीं रुपयांचे नुकसान होते. नगर, आळेफाटा, जुन्नर, अकोले येथील लोकांना पुणे किंवा नाशिक मनमाड मार्गे मुंबईकडे यावे लागते. यामुळे वेळ व पैसा दोन्ही खर्च होतात. याकरिता या परिसरातील लोकांनी कल्याण मुरबाड माळशेज नगर हा रेल्वेमार्ग झाला पाहिजे यासाठी अनेक खासदार व राजकीय नेत्यांना साकडे घातले. व त्यांनीही प्रयत्न केले. ठाणे लोकसभा मतदारसंघातील खासदार राम कापसे, शांताराम घोलप, प्रकाश परांजपे, आनंद परांजपे ते विद्यमान भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपील पाटील यांनीही या मार्गावर रेल्वे धावेल असे आश्वासन देऊन प्रयत्नशील राहिले. अनेक वेळा या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणही झाले. परंतु प्रत्येक अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गाला स्थान मिळाले नाही.

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी मुरबाड येथील तहसीलदार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मुरबाडकरांना शब्द दिला होता की मुरबाड रेल्वे साठी भाजप सरकार कटीबद्ध असून जर रेल्वे मार्ग होत असेल तर महाराष्ट्र शासन त्याचा काही भार उचलेल. परंतु त्यांचीही घोषणा हवेत विरली. महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोनो, मेट्रो, बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प येत असताना तीन दशकांहूनही अधिक काळ होऊनही कल्याण नगर रेल्वे प्रकल्प मार्गी लागत नाही. तत्कालीन सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनीही मुरबाडवासीयांना सिडकोच्या माध्यमातून तळोजा बदलापूर मार्गे मुरबाडला मेट्रोरेल्वे मार्गाने जोडण्याचे आश्वासन दिले होते. संसदेच्या या सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात कल्याण नगर रेल्वेला स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु नेहमी प्रमाणेच स्थान न मिळाल्याने समस्त लोकांचा हिरमोड झाला आहे.

हजारो कुटुंबे यापुर्वीच स्थलांतरित झाली असून अजूनही नाईलाजास्तव होणार आहेत. विकासापासून कोसोदुर या भूभागाला व लोकांना रहावे लागणार आहे. या रेल्वे मार्गासाठी अनेक संघटना सध्या सरकार दरबारी भांडत आहेत. परंतु त्यांच्याही प्रयत्नांना केव्हा यश येईल हे काळच ठरविणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या