नोटाबंदीनंतर लाच घेण्याच्या प्रमाणात ३५ टक्के घट

सामना ऑनलाईन । मुंबई

मोदी सरकारने लागू केलेल्या नोटाबंदीमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात भ्रष्टाचार कमी झाला आहे. लाच घेण्याच्या प्रमाणात ३५ टक्क्यांची घट झाली आहे; अशी माहिती राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.

राज्यात २०१५ मध्ये नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान लाच मागितल्याच्या १८४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. मात्र २०१६ मध्ये नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान लाच मागितल्याचे १२० गुन्हेच दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण हाच आधार मानून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटाबंदीने भ्रष्टाचार कमी झाल्याचे सांगितले.

दरवर्षीप्रमाणे राज्याच्या महसूल विभागात २०१६ मध्येही सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले. महसूल विभागाच्या खालोखाल एमएमआरडीए, पोलीस, पंचायत समिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१६ मध्ये २२३ अधिकारी, २२४ पोलीस, १०९ पंचायत समित्या, एमएमआरडीएचे ५२ अधिकारी यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे दाखल केले.

राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे पुण्यात झाली आहे. पुण्यात १८६, नाशिकमध्ये १५३, नागपूरमध्ये १३७, ठाण्यात १२४, संभाजीनगरमध्ये ११६, अमरावतीमध्ये ११०, नांदेडमध्ये १०४ भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची नोंद झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले. मुंबईत सर्वात कमी ६६ भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची नोंद झाली आहे.

अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मध्यस्थामार्फत पैसे स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.