इसिसचा खात्मा झाल्याचा आनंद, मात्र, धोका कायम आहे- डोनाल्ड ट्रम्प

सामना ऑनलाइन । वॉशिंग्टन

सिरियामध्ये अमेरिकी लष्कराच्या मदतीने सिरियाच्या सैन्याने इसिसचा खात्मा केला आहे. इसिसच्या ताब्यातील बागुज हे अखेरचे गाव मुक्त केल्यानंतर अमेरिकेने इसिसचा खात्मा झाल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विजयाचे स्वागत केले आहे. इसिसचा खात्मा झाला असला तरी दहशतवादी संघटनांकडून जगाला असलेला धोका कायम असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अमेरिका दहशतवादाविरोधातील लढाई सुरूच ठेवेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. बागुज गावात इसिसचा पाडाव करण्यात आला. त्यानंतर ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.

इसिसने ताब्यात घेतलेले 88 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र मुक्त करण्यात आले आहे. इसिसचा सिरियातून खात्मा झाला असला तरी नायजेरिया, फिलीपाइन्ससह इतर ठिकाणी त्यांच्या संघटना सक्रीय आहेत. त्यांचा पूर्णपणे खात्मा होईपर्यंत अमेरिकेची दहशतवादाविरोधातील मोहीम सुरू राहिल असे त्यांनी स्पष्ट केले. बागूजमध्ये इसिसचा पाडाव करण्यात आला असून दहशतवाद्यांचा स्वंयघोषीत म्होरक्यांचाही खात्मा करण्यात आला आहे. इसिसच्या ताब्यातील क्षेत्र मुक्त करण्याची मोहीम पाच वर्षांपासून सुरू होती. या कारवाईत एक लाख बॉम्ब वापरण्यात आले. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सिरियातील अनेक गावांवर ताबा मिळवून इसिसने दहशत निर्माण केली होती. लोकांवर करत असलेल्या अत्याचाराचे व्हिडिओही त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले होते. सिरिया आणि इराकमधील इसिसचा प्रभाव नष्ट झाला आहे. मात्र, त्यांच्या संघटनांकडून या दोन्ही देशांत हल्ले घडवण्यात येत आहेत. सिरियामध्ये आता एकही दहशतवादी शिल्लक नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. सर्व दहशतवाद्यांचा खात्मा होईपर्यंत अमेरिका कारवाई सुरू ठेवणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. जगाला दहशतवादाचा धोका कायम असून दहशतवादाविरोधातील मोहीम सुरू ठेवली पोहिजे, असे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रौ यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या