वडिलांच्या विरहात तिन्ही मुलींनी संपवलं आयुष्य

सामना ऑनलाईन। भुवनेश्वर

ओडिशा येथील मलकानगिरी जिल्हयात वडिलांच्या मृत्यूने निराश झालेल्या मुलींनी घरातला सिलेंडर पेटवून स्वत:ला जाळून घेतल्याची महाभयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

माऊलीगुडी येथे राहणाऱ्या नागेश्वर राव यांचे १२ दिवसांपूर्वी अकस्निक निधन झाले. वडिलांच्या अशा अचानक जाण्याचा त्यांच्या तिन्ही मुलींना जबर मानसिक धक्का बसला होता. पत्नीच्या निधनानंतर नागेश्वर यांनीच तीन मुली व दोन मुलांचा सांभाळ केला होता. यामुळे मुलांचा त्यांच्यावर जीव होता. पित्याच्या जाण्याचा त्यांना जबर आघात बसला होता. बुधवारी नागेश्वर यांचे मुलं अस्थी विसर्जन करण्यासाठी अलाहाबादला गेले होते. त्यावेळी आमूल(२०) रेणुका(१८) व मांगा या तिघी मुलीच घरात होत्या. वडिलांच्या मृत्यूनंतर आता कोणासाठी जगायचे या प्रश्नाने त्यांच्या मनात काहुर माजले होते. त्या शेजारच्यांनाही तेच सांगत होत्या. सगळ्यांनी त्यांना समजावले .पण आता आपल्या जगण्याला काहीच अर्थ नसल्याची खंत त्यांना वाटत होते. त्यातून तिघींनी वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला व सिलेंडरच पेटवले. सिलेंडर स्फोट झाला आणि त्यात तिघी बहिणींचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

नागेश्वर यांच्या घरातून आगीचे लोळ येत असल्याचे बघून शेजाऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. कोणी घरावर पाणी फेकून आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. आगीचे वृत्त कळताच पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रणही मिळवत घरात प्रवेश केला. तेव्हा किचनमध्ये तिघी बहिणींचा कोळसा झालेला मृतदेह त्यांना आढळला. त्यानंतर संध्याकाळी नागेश्वर यांची मुलं अस्थीविसर्जन करुन घरी आल्यावर त्यांना तिघी बहिणींनी स्वत:ला संपवल्याचे कळाले. या दुहेरी आघाताने तेही पूर्णपणे कोलमडून गेले आहेत.