डोईवर अक्षता पडताच वधू-वरांचे वऱ्हाडासह श्रमदान

5

सामना प्रतिनिधी । केज

केज तालुक्यातील पिराचीवाडी या गावाने पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. सोमवार रोजी एकत्रितपणे दोन जोडप्यांचा विवाह सोहळा गावात पार पडला. याप्रसंगी लग्नसमारंभ उरकताच वऱ्हाडासह वधू-वरांनी श्रमदान करून दुष्काळमुक्तीच्या लढ्यात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. आमचा गाव आम्ही दुष्काळमुक्त करणारच, असा संकल्प यावेळी सगळ्यांनी केला. तांदळ्याचीवाडी येथे रहाणारी नवरदेव सैन्यात काम करत आहे. देश सेवा करत असतांनाच गाव दुष्काळमुक्त व्हावं यासाठी त्याने स्वतः लग्नाच्या दिवशी सपत्नीक श्रमदान केले.

पिंपळगाव येथील मधुकर घोळवे यांचा मुलगा अनिल पिराचीवाडी येथील शहाजी कराड यांची मुलगी सीमा हे एक जोडपे व तांदळाचीवाडी येथील महिपती तांदळे यांचा मुलगा सुनील व पिराचीवाडी येथील सहशिक्षक दिनकर कराड यांची मुलगी अनुराधा यांचा विवाह सोहळा पिराचीवाडी येथे संपन्न झाला. यावेळी तीन गावातील वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. वधू-वरांनी डोईवर अक्षता पडतात वर्गासह श्रमदान केले व पिराचीवाडी हे गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही केले. यामधून गावकरी प्रेरणा घेवून मोठ्या संख्येने श्रमदान करून गाव पाणीदार होणार असा विश्वास जलदुत रायचंद कदम, ग्रामदूत सोनवणे यांनी व्यक्त केला.