मोदी-मल्ल्यानंतर बँकेला ५ हजार कोटींचा चुना लावून गुजरातमधील व्यापारी पसार


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यानंतर आणखी एक व्यापारी बँकांना ५ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पसार झाला आहे. गुजरातच्या ह्या व्यापाऱ्याचे नाव नितिन संदेसरा असून ‘स्टर्लिंग बायोटेक’ कंपनीचा तो मालक आहे. काही दिवसांपूर्वी तो दुबईत असल्याचे बोलले जात होते. मात्र तो दुबईत नसून सहपरिवार नायजेरियात पळून गेल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे नायजेरियाबरोबर हिंदुस्थानचा कुठलाही प्रत्यापर्ण करार झालेला नाही. यामुळे नितिनला हिंदुस्थानात परत आणणे ही सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

नितिन बरोबर त्याचा भाऊ चेतन, वहिनी दिप्ती आणि कुटुंबातील इतर सदस्य नायजेरियात आहेत. ईडी व सीबीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचा दावा एका हिंदी वृत्तवाहिनीने केला आहे. मात्र यास अद्यापपर्यंत सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी नितिनला दुबईच्या तपास यंत्रणांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त होते. पण नंतर त्यात काहीच तथ्य नसल्याचे व नितिन आणि त्याचे कुटुंब महिनाभराआधीच नायजेरियात पळून गेल्याचे समोर आले आहे.

हिंदुस्थान व नायजेरियामध्ये प्रत्यार्पण करारच झालेला नसल्याने नितिनला आफ्रिकी देशातून हिंदुस्थानात आणण्यासाठी सरकारला कसरत करावी लागणार आहे. पण तरीही तपास यंत्रणांनी नितिनच्या अटकेसाठी युएआय यंत्रणांना अर्ज पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याव्यतिरिक्त संदेसरा कुटुंबाविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात येणार आहे.

नितिन याने औषधे विकण्यापासून व्यापाऱ्यास सुरुवात केली होती. त्यानंतर तेल, रियल इस्टेटसह त्याने विविध उद्योग सुरू केले. हिंदुस्थानबरोबरच नायजेरिया, युएई, इंग्लड वर्जिन आयलँड, अमेरिका, सेशल्स आणि मॉरिशियसपर्यंत त्याने आपला व्यापार पसरवला. नायजेरियात त्याच्या मालकीच्या तेलाच्या विहिरी असल्याचेही बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने स्टर्लिंग बायोटेकच्या दिल्ली, मुंबई, बडोदा, अहमदाबाद आणि सूरतसह देशातील विविध ५० ठिकाणांवर छापे घातले होते.

summary-after-nirav-modi-and-mallya-sterling-group-nitin-sandesara-fled-to-nigeria-