जैश ए मोहम्मदकडून राजस्थान आणि पंजाबमध्ये स्फोटाची धमकी; अॅलर्ट जारी

3

सामना ऑनलाईन । जयपूर

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पंजाब आणि राजस्थानमधील काही रेल्वे स्थानके स्फोट करून उडवण्याची धमकी दिली आहे. जैश ए मोहम्मदचा कमांडर मसूर अहमदने फिरोजपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापनाला पत्र पाठवून धमकी दिली आहे. या पत्रात पंजाब आणि राजस्थानमधील काही रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळे आणि लष्करी तळांना स्फोट करून उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रानंतर दोन्ही राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

जैश ए मोहम्मदच्या धमकीच्या पत्रानंतर राज्यातील विविध रेल्वे स्थानकात आरपीएफच्या मदतीने शोध मोहिम राबवण्यात येत असून संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. प्रवाशांच्या वस्तूंचीही तपासणी करण्यात येत आहे, असे जोधपूरच्या जीआरपी अधीक्षक ममता विश्नोई यांनी सांगितले. राज्यातील पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पंजाबचे पोलिस महानिरीक्षक अलोक वशिष्ठ यांनी सांगितले. तसेच राज्यातील रेल्वे स्थानकांसोबत धार्मिक स्थळे आणि लष्करी तळांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

जयपूर, रेवाडी, जोधपूर, श्रीगंगानगर रेल्वे स्थानक, लष्करी तळ आणि राज्यातील धार्मिक स्थळे स्फोटाने उडवण्याची धमकी जैश ए मोहम्मदने दिली आहे. तर पंजाबच्या फिरोजपूर, फरीदकोट, बरनाला,अमृतसर आणि जालंधर रेल्वे स्थानकांसह धार्मिक स्थळांवर 13 मे रोजी स्फोट घडवणार असल्याची धमकी पत्रातून देण्यात आली आहे. अमृतसरचे सुवर्ण मंदिर, दुर्जियाना मंदिर, जालंधरमधील देवी तलाव मंदिर, फगवाडमधील हनुमान मंदिर आणि भटिंडामधील गुरुद्वारा 16 मे रोजी स्फोटाने उडवण्याची धमकीही या पत्रात देण्यात आली आहे.