वय लपवणाऱ्यांना बसणार चाप

सामना प्रतिनिधी, नवी मुंबई

रोनाल्डिन्हो, झॅवी हर्नांडेझ, नेयमार, आंद्रे इनिएस्ता या स्टार खेळाडूंची सुरुवात १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपनेच झाली. मात्र उदयोन्मुख खेळाडूंसाठी भक्कम व्यासपीठ करणाऱ्या या वर्ल्ड कपमध्ये वय लपवून देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांचीही संख्याही कमी नाही. पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या नायजेरिया संघातील २६ फुटबॉलपटू ‘ओव्हर एज’ ठरल्यानंतर आता फिफा अधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. हिंदुस्थानात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये वय लपवणाऱ्या खेळाडूंना चाप बसेल एवढे मात्र नक्की.

हिंदुस्थानी संघाचा कसून सराव
हिंदुस्थानचा युवा फुटबॉल संघ ६ ऑक्टोबरला होणाऱ्या सलामीच्या लढतीत अमेरिकेशी दोन हात करणार आहे. त्याआधी लुईस नोर्टोन डी मॅटोस यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी संघ उद्या सायंकाळी मुख्य स्पर्धेआधी अखेरचा सराव करणार आहे. तसेच यावेळी कर्णधार अमरजीत सिंग पत्रकारांशी संवाद साधेल. या सरावात हिंदुस्थानी संघाला आपल्या योजना व्यवस्थित आखाव्या लागतील. त्यानंतर त्यांना थेट मैदानात उतरावे लागेल.

घाना येथील फुटबॉलप्रेमी हिंदुस्थानात येणार
हिंदुस्थानात पहिल्यांदाच फुटबॉल वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येत आहे. मानाच्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल हिंदुस्थानी फुटबॉल फेडरेशनपासून सहा आयोजन स्थळांच्या असोसिएशनपर्यंत सर्वांनीच कंबर कसलीय. त्यामुळे सहभागी झालेल्या देशांमधून हिंदुस्थानात येणाऱ्या फुटबॉलप्रेमींसाठीही उत्तम सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. घाना हा संघ फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार असून यावेळी त्या देशांतून फुटबॉलप्रेमींचा जथा हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात येणार आहे. घाना संघाला त्यांचा सपोर्ट मिळाल्यास त्यांची कामगिरी नक्कीच उंचावेल.