प्रत्येक समस्येवर उपाय आहे

डॉ. अप्रतिम गोयल

वयाच्या ज्येष्ठतेनुसार काही नकोशा असणाऱया समस्या आजींसाठी त्रासदायक ठरतात. त्यावर काय उपाय करता येईल ते पाहूया.

वयानुरूप आपल्या शरीरातील संप्रेरकांमध्ये बदल होत असतात. त्याचे परिणाम विशेषतः महिलावर्गास जास्त त्रासदायक असतात. चेह-यावर अनावश्यक केस उगवणे, त्वचा कोरडी होणे, सुरकुत्या या अशा समस्यांमुळे समस्त आजीवर्ग त्रस्त होतो आणि मग एकतर ‘‘आता या वयात कुणाला दाखवायचे आहे?’’ असे म्हणून त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जाते किंवा मग काहीतरी तात्पुरत्या उपायांचा अवलंब केला जातो, पण त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. आजीने कायम सुंदरच दिसायला हवे. कारण तिची पिढी तिचे अनुकरण करीत असते.

बाजारात उपलब्ध असणाऱया क्रिम आणि जेलमुळे त्वचा खराब होण्याचा धोका असतो. काही जणी रेझरनेही हे केस काढतात. काही जणी थ्रेडिंग आणि वॅक्सिंगचाही आधार घेतात. त्यामुळे केस पुन्हा येताना अधिक जाड येऊ शकतात. यासाठी डॉक्टर आणि सौंदर्य तज्ञांकडून उपचार आणि सल्ले घेऊन चेहऱयावरील नको असलेले केस काढणे योग्य ठरते. प्राथमिक स्तरावर यावर घरगुती उपचारही करून पाहू शकता.

चेह-यावर अनावश्यक केस येण्याची कारणे

काही वेळा ही समस्या अनुवांशिक कारणांमुळे उद्भवू शकते

महिलांमध्ये हार्मोन्स असंतुलित राहण्याचे प्रमाण जास्त असतेयाचे मुख्य कारण पॉलिसिस्टिक डिम्बग्रंथी सिन्ड्रोम (पीसीओएस) या ग्रंथीचे असंतुलन हे अनावश्यक केस येण्याचे मुख्य कारण आहे

स्टोस्टेरोन, साइक्लोस्पोरिन या गोळ्या तसेच एकाग्रता वाढीसाठी मिनऑक्सडिल अशी औषधे घेतल्यास चेहऱयावर केसवाढीचे प्रमाण वाढते

टेस्टेस्टेरॉन हा पुरुषांमध्ये आढळणारा हार्मोन आहे. काही स्त्र्ायांमध्ये पुरुषांमध्ये असणाऱया हार्मोनचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. महिलांमध्ये या हार्मोनचं स्रवण्याचं प्रमाण वाढलं की, त्यांच्या शरीर आणि चेहऱयावर जास्त प्रमाणात केस येतात.

घरगुती उपचार

अर्धा चमचा बेसन पीठ, अर्धा चमचा दूध, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा ताजी साय एकत्र करून चेहऱयाला लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून २५ मिनिटे हे मिश्रण चेहऱयावर तसेच ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर हाताने चेहरा स्वच्छ करून नंतर पाण्याने धुऊन घ्या.  

रोज दहा मिनिटे हळदीचा लेप चेहऱयावर लावा. यामुळे चेहऱयावर केस उगवत नाहीत. त्वचाही उजळते.

जास्तीचे केस काढण्यासाठी शक्यतो घरी तयार केलेला नैसर्गिक वॅक्स वापरू शकता. साखर वितळवून त्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट चेहऱयाला लावून वॅक्सप्रमाणे स्वच्छ करा.

संत्र्याची साल आणि दह्याची पेस्ट लावल्याने चेहरा तजेलदार होतो.  शिवाय चेहऱयावरील अनावश्यक केस विरळ होत जातात.

कायमस्वरूपी उपाय

शेव्हिंग, थ्रेडिंग आणि वॅक्सिंगद्वारे केस काढले जाऊ शकतात, मात्र या उपायांनी ते पुनः पुन्हा येतात. यासाठी अनावश्यक केस काढण्यासाठी कायमस्वरूपी आणि सर्वोत्तम उपाय म्हणजे ‘लेझर हेअर रिमुव्हिंग’. हनुवटी, वरच्या ओठांवरील केस, भुवयांवरील जास्तीचे केस, दाढीप्रमाणे आलेले केस यांवरील केस काढण्यासाठी ही उपचार पद्धती सौंदर्य तज्ञ वापरतात.  काही पुरुषही भुवया आणि दाढीवरील अनावश्यक केस काढण्यासाठी  या पद्धतीचा अवलंब करतात. साधारण आठ भागांमध्ये हा सौंदर्योपचार पूर्ण होतो. यामुळे अनावश्यक केस ९० टक्के कमी होतात.