पेट्रोल डिझेलच्या भडक्याने परभणीकर हैराण

सामना प्रतिनिधी । परभणी

गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. नुकतीच भरीस भर म्हणून पेट्रोलच्या दरात ३१ तर डिझेलच्या दरात ३९ पैशांनी पून्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर लवकरच शंभरी गाठते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुक, दळणवळण, व्यापारी आणि प्रवास यावर वितरीत परिणाम झाला आहे. परभणीकरांनी या दरवाढीला प्रखर विरोध करत सायकल मोर्चा काढून या दरवाढीचा निषेध नोंदविला आहे.

गेल्या निवडणुकीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे भांडवल करुन भाजपाने केंद्रात सत्ता काबीज केली. आता निवडणुका तोंडावर आलेल्या असताना पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सततच्या दरवाढीमुळे अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. जनतेत या दरवाढीमुळे नाराजीचा सूर पसरला आहे. विरोधकांनी देखील दरवाढीचा मुद्दा हाती घेऊन इंधन दरवाढीचे हत्यार उपसले आहे. परभणी शहरात या दरवाढीला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सायकल मोर्चाचे आयोजन करुन इंधन दरवाढीच्या प्रश्नावर रान उठविले आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी वसमत रोडवरील राष्ट्रवादी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय या अंतरावर सायकलवर प्रवास करुन इंधन दरवाढीकडे लक्ष वेधले आहे. वाहतुकीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीमुळे सामान्यातल्या सामान्य माणसाच्या खिशावर डल्ला मारण्याचे अप्रत्यक्ष काम केले जात असल्याची संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.

पुर्वीपेक्षा आता जनजीवनाला प्रचंड वेग आला आहे. कोणतेही काम कमी वेळेत कसे हाईल, यावर भर दिल्या जात आहे. वेगाने कामे करावयाची असेल तर यंत्राचे सहाय्य घ्यावेच लागते. हे यंत्र चालविण्यासाठी इंधनाशिवाय पर्याय नाही. एकीकडे इंधन ही नागरिकांची नित्याची बाब बनली आहे. याचाच फायदा घेत शासन वारंवार इंधन दरवाढ करत आहे. यामुळे नागरीकांमधून प्रचंड नाराजीचा सुर उमटत आहे. इंधन दरवाढ ही एक डोकेदुखी ठरू पाहत आहे. याचा निषेध करण्यासाठी विरोधकही रस्त्यावर उतरले आहेत. शासनाने त्वरीत इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. अद्यापर्यंत शासनाने कोणतीही दरवाढ मागे घेतली नाही. परभणी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यात आल्याने विनाकारण इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नसताना केवळ दरवाढीचा फटका मात्र सहन करावा लागत आहे.