पुनंद जलवाहिनीच्या विरोधात शेतकऱ्यांचा जागता पहारा: पाणीप्रश्नी सर्वपक्षीयांचा आंदोलनाचा इशारा

सामना प्रतिनिधी । कळवण

अर्जुनसागर (पुनंद) धरणातून सटाणा शहरासाठी नेण्यात येणाऱ्या पाइपलाइनचे काम शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सुरू झाले नाही. त्यामुळे जलवाहिनीच्या विरोधातला लढा तीव्र करून येत्या काळात तालुक्यातील शेतकरी व पुनंद खोऱ्यातील आदिवासी बांधव जागता पहारा ठेवून ही योजना स्थगित करण्यास सरकारला भाग पाडतील, असा इशारा सर्वपक्षीय बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी दिला.

अर्जुनसागर (पुनंद )प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पाणी देण्यास आमचा विरोध नसून जलवाहिनीला विरोध आहे व राहील, पाणी न्यायचे असेल तर नदी किंवा कालव्यातून घेऊन जावे, अशी भूमिका कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी व आदिवासी बांधव, महिलांची आहे आणि आजच्या बैठकीतून अधिक स्पष्ट झाले. पाण्यासाठी आम्ही सर्व एक आहोत एक राहू, पाणी हाच पक्ष असा निर्धार करीत केळझरमधून जलवाहिनीद्वारे पाणी नेऊन सटाणा शहराचा पाणीप्रश्न सोडवावा, राज्य सरकारने पोलीस व शासकीय यंत्रणेचा अवलंब करून पाणी योजना राबविण्याचा निर्धार केल्यास कळवण तालुक्यातील नेते आणि जनता उधळून लावतील, असा इशारा आजच्या बैठकीतून देण्यात आला.

जलवाहिनीविरोधातील बैठकीला कृती समितीचे अध्यक्ष देविदास पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे, वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील, शांताराम जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, सभापती केदा ठाकरे, लाला जाधव, माकपचे हेमंत पाटील, मोहन जाधव, महिला नेत्या सुमित्रा बहिरम आदी उपस्थित होते.

मार्चच्या 7 तारखेला पोलिसांच्या बंदोबस्तात सटाणा नगर परिषदेच्या जलवाहिनेच्या कामाला प्रारंभ होण्यापूर्वी देविदास पवार, जयश्री पवार, नितीन पवार, राजेंद्र भामरे, महेंद्र हिरे यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव व महिला यांनी तब्बल 9 तास काठरे चौफुलीवर ठिय्या केल्याने महसूल, पोलीस व सटाणा नगर परिषद यंत्रणा, ठेकेदार यांना माघारी फिरावे लागल्याने योजनेचे काम थांबविण्यात यश आले.

आचारसंहिता लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेसंदर्भात चर्चा करण्यास होणारी बैठक लांबल्याने आचारसंहितेनंतर पुन्हा काम सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेऊन या विरोधात झालेल्या आंदोलनाची माहिती शेतकरी नेते देविदास पवार यांनी बैठकीत दिली.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, संदीप वाघ, महेंद्र हिरे, शीतलकुमार अहिरे, संभाजी पवार, दशरथ बच्छाव, संजय रौंदळ, किशोर पवार, विलास रौंदळ, रामा पाटील, किशोर पवार, संतोष मोरे, घनशाम पवार, मोहन जाधव, संतोष हिरे, दादाजी पवार, रौंदळ आदींसह तालुक्यातील शेतकरी, अदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.