कुलींचे नागपूर रेल्वेस्थानकावर काम बंद आंदोलन

सामना प्रतिनिधी ।नागपूर

बॅटरी कारमधून प्रवाशांचे लगेज वाहून नेण्यास विरोध दर्शवित आज बुधवारी कुलींनी रेल्वेस्थानकावर काम बंद आंदोलन केले. रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॅनीयल आणि स्टेशन डायरेक्टर दिनेश नागदिवे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सर्वच मागण्यांवर सकारात्मकता दर्शविली. त्यामुळे कुलींनी लांबणारे आंदोलन आजच संपविले.

सेंट्रल रेल्वे भारवाहन संघाचे अध्यक्ष अब्दुल माजीद यासंदर्भात म्हणाले की, बॅटरी कारने लगेज वाहून नेण्यास कुलींचा तीव्र विरोध आहे. यामुळे कुलींचा उर्दनिवार्हाचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रशासनातर्फे अधिकाऱ्यांनी यावर सकारात्मकता दर्शविली. यासाठी बॅटरी कार संदर्भातील धोरणात बदल क रण्यावर विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कुलींच्या लटकलेल्या बिल्ला ट्रॉन्सफरच्या मुद्यावर तातडीने कागदपत्रे पूर्व करून फाईल निकाली काढण्याचे आश्वासन दिले. कुलींच्या रेस्टहाउसच्या मुद्यावरही अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवित उद्यापासूनच काम सुरू करण्यात येईल असे सांगितले. तर बल्लारशहा, चंद्रपूर रेल्वेस्थानकावरील अद्याप कुलींना गणवेश देण्यात आले नाही. हा मुद्याही प्राथमिक तेने निकाली काढण्याचे आश्वासन दिले. भारवाहक संघाने कुलींच्या मुद्यावर तोडगा निघाला नाहीतर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला होता. मात्र कुलींच्या प्रश्नावर प्रशासनातील अधिकाऱ्यांची सकारात्मकता आणि त्यांचा शब्द राखत लांबणारे आंदोलन कुलींनी आज संपविले.