फसवून शेतामध्ये टॉवर उभारला: शेतकरी कुटुंबीयांचे उपोषण

7

सामना प्रतिनिधी । नगर

फसवणूक करुन शेतामध्ये टॉवर उभारणार्‍या विश विंड इन्फास्ट्रक्चर एलएलपी कंपनीच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार अन्याय, निवारण कृती समितीच्या वतीने इंदूबाई ठोंबे व रोहिणी ठोंबे या शेतकरी कुटुंबीयांनी गुरुवार पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले.

विश विंड इन्फास्ट्रक्चर एलएलपी कंपनीचे अधिकारी असलेले सुभोजित भट्टाचार्य, लक्ष्मण डोंगरे, भाऊसाहेब घोरपडे, शोभा घंगाळे यांनी फसवणुकीने खोटे कागदपत्र तयार करून शेतकरी कुटुंबीय सुशिक्षित असून कागदपत्रावर अंगठ्याचे ठसे दाखवून संमती पत्र तयार केले. या बनावट संमतीपत्राद्वारे कंपनीने नगर तालुक्यातील माथणी येथे गट नंबर 15 मध्ये शेतीची नासधूस करुन टॉवर उभारल्याचा आरोप ठोंबे कुटुंबियांनी केला आहे.

सदर टॉवर उभारण्यास विरोध केला असता कंपनीने शेतकर्‍यांना पोलिसांच्या धमक्या दिला. तर उभारलेल्या टॉवरचा मोबदला मुळ शेतकर्‍यांना न देता दलालांना देण्यात आला आहे. कंपनीत वेळोवेळी चकरा मारुन देखील दाद मिळत नसल्याने फसवणुक करणार्‍या या कंपनीच्या अधिकार्‍यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल व्हावा, शेतीची नासधुस केल्याबद्दल कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी व शेतामध्ये उभा केलेला अनधिकृत टॉवर त्वरीत हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. या उपोषणात ऋतिका कांबळे, रवींद्र ठोंबे, कृती समितीचे अध्यक्ष मोहन ठोंबे आदी सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या