ऑनलाइन कामाच्या सक्ती विरोधात शिक्षकांचे आंदोलन

सामना ऑनलाईन । खेड

ऑनलाईन कामाची प्राथमिक शिक्षकांवर केली जाणारी सक्ती, त्यामुळे अध्यापनामध्ये येणारा व्यत्यय याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खेड येथील विविध शिक्षक संघटनांनी धरणे आंदोलन केले. येथील पंचायत समिती समोर केलेल्या या धरणे आंदोलनामध्ये सुमारे ५०० शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी खेडचे गटविकास अधिकारी पारसे यांना शिक्षक संघटनांच्या वतीने निवेदनही देण्यात आले.

रत्नागिरी जिह्याचा भौगोलिकदृष्टय़ा विचार केला तर हा जिल्हा सह्यद्रीच्या कडय़ाकपारीत वसलेल्या आहे. ग्रामीण भागात अद्याप नेटवर्क पोहचलेले नाही त्यामुळे ऑनलाईन काम करताना शिक्षकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. ऑनलाईन काम करण्यासाठी शिक्षकांना शहराच्या ठिकाणी असलेल्या सायबर कॅफेमध्ये यावे लागत आहे. यामध्ये पूर्ण दिवस वाया जात असल्याने त्याचा थेट परिणाम अध्यापनांवर होत आहे.

ऑनलाईन कामांमुळे अध्यापनामध्ये येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षकांना ऑनलाईन कामाची सक्ती केली जावू नये अशी विनंती शिक्षक संघटनांच्या वतीने वारंवार शासनाला करण्यात आली. मात्र शासनाकडून शिक्षकांची ही विनंती गांभिर्याने घेतलीच जात नाही. काही महिन्यांपूर्वी शिक्षक संघटनांनी ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि तसे पत्र शासनाच्या संबधित यंत्रणेलाही दिले. मात्र तरीही शासनाकडून ऑनलाईन कामांची सक्ती केली जात असल्याने खेड तालुक्यातील विविध संघटनांनी खेड पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शासनाकडून केल्या जाणाऱया ऑनलाईन कामाच्या सक्तीचा निषेधही करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या. धरणे धरलेल्या शिक्षकांनी खेड पंचायत समितीची गटविकास अधिकारी गुरुनाथ पारसे यांना यावेळी निवदेन दिले. यावेळी खेड पंचायत समितीच्या सभापती सौ. भाग्यश्री बेलोसे, उपसभापती विजय कदम आदी उपस्थित होते.