रायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

1

सामना प्रतिनिधी । अलिबाग

रायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे शुक्रवारी (दि . १८ ) आज रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.

अध्यक्ष जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्याना सादर केले. रायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्रा. भरत दळवी, खजिनदार प्रा. प्रकाश पाटील, उपाध्यक्ष एस. एस. कीर्तने आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या साठीची नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करावी. कायम विनाअनुदान तत्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी घोषित करून त्यांना माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करून अनुदानित करावा. त्वरित अनुदान द्यावे. 2012 – 2013 पासून नियुक्त शिक्षकांना नियुक्ती दिनापासून नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे. सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे. 24 वर्ष सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना निवड श्रेणी द्यावी. 11 वीच्या ‘ऑनलाईन‘ प्रवेश प्रक्रियेत प्रथम तीन फेर्‍या अनुदानितच्याच कराव्यात. कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रशासन स्वतंत्र करावे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभ करण्यात यावी. शिक्षण विभागातील सर्व रिक्त जागांवर नेमणुका करून प्रभारी राज्य संपवावे. आदी 32 मागण्याचा या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.