चंदगड नगरपंचायतीसाठी साखळी उपोषण सुरूच; शिवसेनेचा पाठिंबा

सामना प्रतिनिधी । चंदगड

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याच्या मागणीसाठी चंदगड येथील नूतन प्रशासकीय इमारतीसमोर चार दिवसांपासून सुरु असलेल्या साखळी उपोषणाला शिवसेनेनेसह विविध संघटनांनी आपला पाठिंबा दिला.

तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु असून चार दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. आज साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी मुस्लीम संघटना, तालुका बार असोशिएशन, बेरड रामोशी संघटना, जेष्ठ नागरिक संघटना आदी सहभागी झाल्या होत्या. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, जिल्हा महिला संघटक सौ. संज्योती मळविकर सह संपर्कप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, चंदगड विधानसभा संघटक संग्रामसिंह कुपेकर, संतोष मळविकर, माजी आमदार भरमू पाटील, जिल्हा परीषद सदस्य अरुण सुतार आदींनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.