कृषी अधिकार्‍यांचे असहकार आंदोलन

सामना प्रतिनिधी । नगर

सातारा जिल्ह्यातील पाटणचे कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांना मारहाण करणार्‍या आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा वर्ग-दोन अधिकार्‍यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे.

राज्य कृषी सेवा वर्ग-दोनच्या अधिकारी संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कृषी विभागातील हजारो पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग -एकची 28, वर्ग-दोनची 332, वर्ग-दोन कनिष्ठची 684, कृषी सहायकाची 2 हजारपदे रिक्त आहेत. या रिक्तपदांमुळे कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर अतिरिक्त ताण येत आहे. अशा परिस्थितीमध्ये कर्मचार्‍यांवर कामाचा ताण येत आहे. तरीही कामे सुरू आहेत.पाटण येथील कृषी अधिकारी आवटे यांना मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली आहे. यापूर्वीही पारोळा (जि. जळगाव), पूर्णा (जि. परभणी), मोताळा (जि. बुलडाणा) येथील कृषी अधिकारी व सहायकांवर हल्ले झाले आहेत. हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी असहकार आंदोलन केले जाणार आहे. सर्व अधिकारी काळ्या फिती लावून असहकार आंदोलन करतील.

या निवेदनावर बी. एस. नितनवरे, एस. के. शिरसाठ, डी. टी. सुपेकर, के. एस. मोरे, आर. एस. माळी आदींच्या सह्या आहेत.