प्रेयसीला राखी बांधायला लावली, विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न


सामना ऑनलाईन। आगरतळा

एका खासगी शाळेतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनीला तिच्या प्रियकराला जबरदस्तीने राखी बांधावयास लावली. यामुळे सगळ्यांसमोर नाचक्की झाल्याने विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवरुन उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे घडली आहे. दिलीप कुमार साहा असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

‘डेक्कन क्रॉनिकल’ या वृत्तपत्रात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. दिलीपचे शाळेतीलच एका विद्यार्थिनीबरोबर प्रेमसंबंध होते. यास दोघांच्याही घरातल्यांचा विरोध होता. यामुळे सोमवारी मुख्याध्यापकांनी दिलीप व त्या विद्यार्थिनीला पालकांना शाळेत आणण्यास सांगितले होते. दोघांचे पालक शाळेत येताच मुख्याध्यापकांनी त्यांच्या समोर विद्यार्थिनीला दिलीपला राखी बांधण्यास सांगितले. यास दोघांनी विरोध केला. संतप्त मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनीकडून जबरदस्तीने दिलीपच्या हातावर राखी बांधून घेतली. यामुळे पालक व इतर शिक्षकांसमोर अपमान झाल्याने दिलीप अस्वस्थ झाला. तो तडक शाळेच्या गच्चीवर धावत गेला व त्याने खाली उडी मारली. त्यानंतर दिलीपला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दरम्यान, शाळा प्रशासनाच्याविरोधात पालक व विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

summary-agrtala-teachers-force-student-to-tied rakhi by-girlfriend