ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळा, दलाल ख्रितियन मिशेलला दुबईतून दिल्लीत आणले

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली 

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी हिंदुस्थानला हवा असलेला ब्रिटिश नागरिक ख्रिस्तिन मिशेल याला हिंदुस्थानच्या तपास एजन्सीने दुबई येथून खासगी विमानाने दिल्लीत आणले आहे. या हेलिकॉप्टर खरेदीच्या व्यवहारात एक मध्यस्थ असलेल्या मिशेलला मंगळवारी मध्य रात्रीच नवी दिल्लीत आणले आहे.

ख्रिस्तिन मिशेलचे हिंदुस्थानकडे प्रत्यार्पण करण्यास दुबईतील न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये मंजुरी दिली. यामुळे त्याला ताब्यात घेण्यात हिंदुस्थानी तपास यंत्रणांना यश आलेले आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहार हा 3600 कोटी रुपयांचा असून या व्यवहारात मध्यस्थ असलेल्या मिशेलला 225 कोटी रुपयांची लाच मिळाल्याचा आरोप आहे. मिशेलबरोबरच गुडिओ हसछके आणि कार्लो गेरोसा हे इतर दोन मध्यस्थ आहेत. मिशेलविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढलेली होती.

ख्रिस्तियन मिशेलचे प्रत्यार्पण करावे अशी विनंती या आखाती देशाला 2017 मध्येच हिंदुस्थानने केली आहे. मिशेलविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोर्टात जून 2016 मध्ये आरोपपत्र दाखल केलेले आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात मिशेलला तब्बल 225 कोटी रुपये देण्यात आले असे या आरोपपत्रात म्हटले आहे, परंतु हे पैसे म्हणजे सरळसरळ लाच आहे. ही लाच या कंपनीची 12 हेलिकॉप्टर्सची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दिलेली आहे असे ‘ईडी’ने आरोपपत्रात म्हटले आहे.