हार्दिक पटेल यांना थप्पड, भाषणादरम्यान घडला प्रकार

1

सामना ऑनलाईन। अहमदाबाद

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजरातमधील सुरेंद्रनगर येथे भाषण करताना काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना भरसभेत व्यासपीठावर चढून तरुण गुर्जर या व्यक्तीने थप्पड मारली. अधिक आक्रमक होऊन पटेल यांना मारण्याच्या तयारीत असतानाच उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. यावेळी उडालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याची सुटका केली.

जबरदस्त मारहाण झाल्याने तरुण गुर्जर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर बोलताना हार्दिक पटेल यांनी भाजपकडून आपल्या जिवाला धोका असून त्यांच्याकडून मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीदेखील अशा प्रकारे हल्ल्यांचा प्रयत्न भाजपकडून झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आंदोलनाचा त्रास झाला म्हणून मारहाण – तरुण गुर्जर

पाटीदार आंदोलनाच्या वेळी माझी पत्नी गर्भवती होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना या आंदोलनामुळे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यावेळी झालेल्या त्रासामुळे कोणत्याही परिस्थितीत आंदोलनकर्त्या हार्दिक पटेलला धडा शिकवायचा असा निर्धार केला होता. मनात येईल तेव्हा आंदोलन करून रस्ते बंद करतो, गुजरात बंद करतो हा काय हिटलर आहे का? असा संताप तरुण गुर्जर याने व्यक्त केला आहे.