अमेरिकेची आता अंतराळातही दादागिरी

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

आतापर्यंत चित्रपट आणि व्हिडियो गेम्समध्ये स्पेस फोर्स आपण बघितले असेल मात्र आता ते प्रत्यक्षात साकार होणार आहे. अंतराळात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि तंत्राने सज्ज असे दल उभारून अमेरिकेने भविष्यात अंतराळातील लढाईचे संकेत दिले आहेत. स्पेस फोर्सच्या माध्यमातून अमेरिकेला अंतराळात दबदबा निर्माण करायचा आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पेंटॉगॉनपेक्षा  वेगळा असे स्पेस फोर्स तयार करण्याचे आदेश दिले आहेत. स्पेस फोर्स म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेले असल्याचे डोनाल्ड ट्रंप यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत चीन आणि रशिया किंवा अन्य कोणत्याही राष्ट्राने आघाडी घ्यावी, अशी आमची इच्छा नाही. स्पेस फोर्समुळे अमेरिकेचा अंतराळात दबदबा वाढणार आहे. ही अमेरिकेच्या सैन्यदलाची सहावी शाखा असेल. नुकतीच नॅशनल स्पेस कौन्सिलच्या तिसऱ्या बैठकीत यांनी संरक्षण मंत्रालयाला स्पेस फोर्सची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत.