एअर इंडिया कर्मचाऱ्यांच्या वेतनाला सलग पाचव्या महिन्यात विलंब

सामना प्रतिनिधी । मुंबई

कर्जाच्या बोझाखाली दबलेल्या एअर इंडियावडे कर्मचाऱ्यांना वेतन द्यायलाही पैसे आहेत की नाहीत अशी अवस्था झाली आहे. यावेळी सलग पाचव्या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनाला उशीर झाला आहे. गेल्या जुलै महिन्याच्या वेतनाचा अद्याप पत्ता नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

वेतन न मिळाल्याने इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशनचे सरचिटणीस कॅप्टन दीपांवर गुप्ता यांनी एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना एक पत्र पाठवले आहे. ‘सलग पाचव्या महिन्यात वेतन मिळण्यास उशीर झालाय असे सांगण्यास खूप दुःख होतेय. तुमच्याकडून आश्वासन आणि खात्री देऊनही वेतन आणि उड्डाण भत्ता वेळेवर मिळणार नाही अशी पूर्वसूचना व्यवस्थापनाने कर्मचाऱ्याना दिलेली नाही. वेतन वेळेवर मिळत नसल्याने बँकांनी कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला आहे. आम्ही कंपनीसाठी आमचे रक्त आटवले, घाम गाळला. पण व्यवस्थापन आमच्याकडे एखाद्या ओझ्यासारखे पाहत आहे.’ असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.