जेट एअरवेजच्या प्रवाशांसाठी एअर इंडियाची विशेष ऑफर

3

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जेट एअरवेजच्या प्रवाशांसाठी सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने विशेष ऑफर दिली आहे. जेट एअरवेजच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तिकीट घेतलेल्या प्रवाशांना एअर इंडिया सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा देणार आहे. जेट एअरवेजचे तिकीट घेतलेले प्रवासी जेटची सेवा बंद पडल्याने संकटात सापडले आहेत. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एअर इंडियाने ही ऑफर दिली आहे.

एअर इंडियाने गुरुवारी पत्रक जारी करून ही ऑफर दिली आहे. ज्या प्रवाशांनी जेट एअरवेजने परदेशात जाण्यासाठी तिकीट काढले होते, त्या प्रवाशांना विशेष ऑफरद्वारे सवलतीच्या दरात परदेशात प्रवासाची सुविधा देणार असल्याचे एअर इंडियाने जाहीर केले आहे. पॅरिस, लंडन, हीथ्रो, सिंगापूर, दुबई, हाँगकाँग, अबुधाबी, जेद्दाह आणि मस्कट या देशात जाणाऱ्या प्रवाशांना या ऑफरचा फायदा होणार आहे. जेट एअरवेजची सेवा बंद झाल्याने या देशात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एअर इंडियाने हे पाऊल उचलल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ज्या प्रवाशांकडे जेट एअरवेजचे कन्फर्म तिकीट आहे, त्यांना ठराविक देशात जाण्यासाठी ही ऑफर देण्यात आली आहे.