एअर इंडियाच्या गुटगुटीत हवाई सुंदरींना करावी लागणार कार्यालयीन कामे

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
एअर इंडियाने तब्बल ५७ गुटगुटीत हवाई सुंदरींची वजन वाढल्यामुळे कार्यालयीन विभागात बदली केली आहे. यापुढे या हवाईसुंदरी विमानात न दिसता कार्यालयात बसून काम करणार आहेत. वजन कमी करण्यासाठी गुटगुटीत हवाई सुंदरींना ठराविक कालावधी देण्यात आला होता. पण दिलेल्या अवधीत या हवाई सुंदरींना वजन नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही. यामुळे त्यांना कार्यालयीन विभागातच कायम करण्यात आले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने एअर इंडियाच्या एका अधिका-याच्या हवाल्याने हवाई सुंदरींविषयीचे वृत्त प्रसिध्द केले आहे. या वृत्तानुसार एअर इंडियाच्या नियमांपेक्षा जास्त वजन वाढल्याने या हवाई सुंदरींकडून गेल्या महिन्यातच विमानातील कामांची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. त्यांची बदली कार्यालयीन विभागात करण्यात आली. तीन महिन्याच्या कालावधीत त्यांनी वजन कमी केल्यास त्यांना पुन्हा विमानातील सेवेत रुजू करण्यात येणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण या हवाई सुंदरींना दिलेल्या अवधीत वजन कमी करणे शक्य झाले नाही. तसेच विमान सेवेत असताना या हवाई सुंदरींना मिळणारा ३५ ते ५० हजार रुपये विमान भत्ता आता बंद करण्यात आला आहे. यामुळे आधीच्या पगाराच्या तुलनेत कमी पगारात हवाई सुंदरींना काम करावे लागणार आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एविएशनने दोन वर्षापूर्वीच केबिन क्रूच्या वजन, दृष्टी आणि श्रवणक्षमतेसंदर्भात कडक नियम तयार केले होते. त्यांतंर्गतच ही कारवाई करण्यात आली आहे.