हिंदुस्थानची हवा किती प्रदूषित?

1

वेब न्यूज ‘सेंटनल-५पी’ नावाचा एका युरोपचा उपग्रह नुकताच अंतराळात सोडण्यात आला आहे. वायुमंडळातील तसेच जगभरातील वाढत्या प्रदूषित हवेचा अभ्यास करणे आणि त्यानुसार योग्य ती सुरक्षा धोरणे आखणे यासाठी या उपग्रहाकडून मदत मिळणार आहे. या  ‘सेंटनल-५पी’ने नुकत्याच पाठवलेल्या रिपोर्टनुसार हिंदुस्थानची हवा ही इतर दक्षिण आशियाई देशांपेक्षा थोडी वेगळी आहे. या हवेत ‘फॉर्मलडिहाईड’चे अस्तित्व आढळून आले आहे. ‘फॉर्मलडिहाईड’ हा एक प्रकारचा रंगहीन गॅस आहे. खरे तर हा गॅस नैसर्गिकरीत्या झाडे आणि वनस्पतींद्वारे वातावरणात सोडला जातो आणि सध्या मात्र प्रदूषण करणाऱया अनेक घटकांमुळेदेखील हा मोठय़ा प्रमाणावर सोडला जात आहे. वायुमंडळात नायट्रोजन आणि ऑक्सिजनसारख्या महत्त्वाच्या घटकांच्या तुलनेत फॉर्मलडिहाईडचे (CH२O) अस्तित्व खरे तर अगदी नगण्य असते. हवेचे एक अरब अणू घेतले तर त्यातले थोडेच अणू हे फॉर्मलडिहाईडचे (CH२O) असतील. मात्र तरीही प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी या अणूंचा महत्त्वाचा उपयोग होतो. या वायूकडून जे संकेत मिळतात, त्यातले ५० ते ८० संकेत हे नागरी वस्त्यांमधून मिळतात. संकेताची टक्केवारी यापेक्षा जास्त असेल तर मात्र ती आग किंवा प्रदूषणाचा धोका दर्शवते. हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात शेतांत आगी लावल्या जातात किंवा स्वयंपाकासाठी, शेकोटीसाठी आजही मोठय़ा प्रमाणात लाकूडफाटा जाळला जातो. हे सर्वदेखील प्रदूषण वाढवायला हातभार लावतच असते. सेंटनल-५पीला (S५P) युरोपियन स्पेस एजन्सीने युरोपियन युनियनच्या ‘कोपर्निकस अर्थ-मॉनिटरिंग’ या उपक्रमासाठी बनवले आहे. या उपग्रहात बसवलेल्या ‘ट्रोपोमी’ या उपकरणाद्वारे वायुमंडळातील ओझोन, सल्फर, नायट्रोजन ऑक्साईड, मिथेन, कार्बन मोनोक्साईड आणि एरोसोल्स या सर्वांचा अभ्यास केला जातो. आपण श्वास घेण्यासाठी ज्या हवेचा वापर करतो, त्या हवेला अशुद्ध करण्यात याच घटकांचा मोठा सहभाग असतो. ट्रोपोमीच्या डाटाचा अधिक अभ्यास केल्यानंतर देशाच्या प्रदूषणाविषयी अधिक समर्पक माहिती हाती लागणार आहे.