‘बोइंग 737 मॅक्स’वर बंदी, विमानप्रवास महागला; तिकिटाचे दर दुप्पट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बोइंग 737 मॅक्स विमानांच्या उड्डाणांवर घातलेल्या बंदीचा फटका विमान प्रवाशांना बसला आहे. फ्लाईट्सच्या कमतरतेमुळे प्रमुख हवाई मार्गांवरील विमानांच्या भाडय़ात दुपटीने वाढ झाली आहे. दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई, मुंबई-कोलकता आणि मुंबई-बंगळुरूचे विमान भाडे गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे.

इक्जिगोचे सीईओ आलोक वाजपेयी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विविध कारणांमुळे सध्या अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे स्वाभाविकच प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत कमी सीट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे विमानांच्या तिकीटदरात वाढ झाली आहे. मुंबई-चेन्नई प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल 26 हजार 73 रुपये भाडे मोजावे लागत आहे. गेल्यावर्षी या तिकिटाचा दर 5 हजार 369 रुपये एवढा असल्याचेही वाजपेयी यांनी स्पष्ट केले.

विमानप्रवास आणखी महागणार
होळीचा सण जवळ आला आहे. त्यानंतर शाळांची उन्हाळी सुट्टीदेखील सुरू होणार आहे. त्यामुळे विमान तिकिटांचा दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात्रा डॉट कॉमनुसार प्रवासाच्या आधी तिकीट खरेदी केल्यानंतर दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई, मुंबई-कोलकाता आणि मुंबई-बंगळुरूचे विमान भाडे गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले होते.

  • बुधवारी (14 मार्च) मुंबई-चेन्नई मार्गावरील तिकिटाचे दर 20 हजार 329 रुपये एवढे होते. गेल्यावर्षी याच दिवशी 5 हजार 671 रुपये आकारण्यात आले होते.
  • तर मुंबई-दिल्लीच्या तिकिटाचा दर 13 हजार 495 रुपये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या भाडय़ात 137 टक्क्यांची वाढ झाली आहे.
  • इथियोपिअन एअरलाइन्सच्या 737 मॅक्स – 8 विमानाला रविवारी अदीस अबाबाजवळ अपघात झाला. या अपघातात विमानातील सर्वच्या सर्व 157 लोक ठार झाले.
  • यानंतर केंद्र सरकारने बोइंग 737 मॅक्स विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे सध्या मोठय़ा प्रमाणावर विमानांची कमतरता भासत आहे. प्रवासासाठी फारच कमी फ्लाईट्स उपलब्ध आहेत.
  • स्पाइस जेटकडे या बनावटीची 12 विमाने आहेत. केंद्राच्या या बंदीचा सर्वाधिक फटका स्पाईस जेटला बसला आहे.