दहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी 1999 साली काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या विमानाचे अपहरण करून जैशचा म्होरक्या मसूद अझहरला हिंदुस्थानच्या तावडीतून सोडविले होते. त्याच पार्श्वभूमीवर दहशतवादी पुन्हा एकदा हिंदुस्थानातील विमान हायजॅक करण्याच्या तयारीत असून तशा प्रकारची धमकीच दहशतवाद्यांकडून देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी एअर इंडियाला एक निनावी कॉल आला असून त्याद्वारे विमान अपहरण करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे देशभरातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच विमानतळांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे.

राज्यभरात हायऍलर्ट; रेल्वे स्थानके, एसटी स्थानके, संवेदनशील ठिकाणांवर कडक वॉच

शनिवारी सकाळी एअर इंडियाच्या एअरपोर्ट ऑपरेशन कंट्रोल सेंटरला एक कॉल आला. समोरील व्यक्तीने हिंदुस्थानातील विमानतळावरून एका विमानाचे अपहरण करण्यात येणार असून ते विमान पाकिस्तानला नेण्यात येणार असल्याचे सांगितले. या फोननंतर ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिएशन सिक्युरिटीने सर्व विमानतळांना सतर्क केले असून प्रत्येक विमानतळासाठी व विमान कंपन्यांसाठी सुरक्षेच्या बाबतीतली नवीन नियमावली तयार केली आहे. त्या नियमावलीनुसार विमानतळ परिसरात तसेच रनवे जवळ येणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी, प्रवाशांच्या सामानाची व्यवस्थित तपासणी करणे, कशाबाबतही संशय आल्यास तत्काळ रिपोर्ट करणे, कार्गो व कॅटरिंग विभागातील तपासणी वाढवणे, तसेच विमानतळावर तत्काळ मदत करू शकेल असे पथक नेमणे असे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

धमकीसाठी आलेला फोन हा खोटा किंवा कुणीतरी केलेली मस्करी देखील असू शकते. मात्र अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नसल्याने सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.