World cup 2019 टीम इंडियाचं दार बंद नाही, मुंबईकर रहाणेला शेवटची संधी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी एक दिवसीय विश्वचषकासाठी हिंदुस्थानचा संघ जवळपास निश्चित झाला आहे. फक्त मधल्या फळीमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा तगडा खेळाडू टीम इंडियाला हवा आहे. परंतु या गर्दीमध्ये मुंबईकर अजिंक्य रहाणेचे नाव चर्चेतही दिसून आले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-20 आणि एक दिवसीय मालिकेमध्ये रहाणेला संधी देण्यात आली नाही. रहाणे विश्वचषकात दिसणार नाही अशी चर्चा सुरू झाली. परंतु या चर्चांना पूर्णविराम देऊन विश्वचषकामध्ये स्थान मिळवण्याची शेवटची संधी रहाणेकडे अद्यापही आहे.

रहाणेने हिंदुस्थानकडून 90 एक दिवसीय सामन्यात 2962 धावा केल्या आहेत. 35.26 ची सरासरी आणि तीन शतक व 24 अर्धशतकांसह त्याने या धावा केल्या आहेत. सलामीवीर किंवा मधल्या फळीमध्ये खेळू शकणारा हा खेळाडू गेल्या काही महिन्यात विशेष कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे विश्वचषकाच्या यादीतून त्याचे नाव बाद झाल्याची चर्चा सुरू झाली. परंतु रहाणेचा अनुभव पाहता विश्वचषकामध्ये त्याचा हिंदुस्थानला फायदाच होऊ शकतो. कारण नुकत्याच झालेल्या एक दिवसीय मालिकेमध्ये पहिले तीन फलंदाज विशेष कामगिरीमध्ये हिंदुस्थानचा संघ ढेपाळतो हे पाहिले. याचमुळे ऑस्ट्रेलियाने तब्बल दहा वर्षाने हिंदुस्थानमध्ये मालिका विजय मिळवला.

आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो. आयपीएलमध्ये तडाखेबाज फलंदाजी करून निवड समितीला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडण्यासाठी रहाणेला संपूर्ण अनुभव पणाला लावावा लागणार आहे. परंतु विराटने याआधी आयपीएलमधील प्रदर्शन विश्वचषकासाठी ग्राह्य नसेल असा इशारा देताना अंतिम 15 खेळाडूंचा संघ जवळपास निश्चित झाला आहे, असे म्हटले होते. त्यामुळे रहाणेला काहीतरी अविश्वसनिय कामगिरी करून आपल्याकडे निवड समितीचे लक्ष वेधावे लागणार आहे.

आयपीएलमध्ये रहाणे मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे या संघाकडून खेळला आहे. आयपीएलच्या एकून कारकीर्दीमध्ये रहाणेने 80 लढतीत 2182 धावा चोपल्या आहेत. नाबाद 103 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.